|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘सिंधुदुर्ग शिमगोत्सव’ पर्वणी उद्या

‘सिंधुदुर्ग शिमगोत्सव’ पर्वणी उद्या 

 सावंतवाडी : गोवा आणि सिंधुदुर्गच्या मातीतील लोककला शनिवारी येथील मोती तलावाच्या काठावर फेर धरणार आहेत. लोककलांना पर्यटनाची जोड देण्याची मुहूर्तमेढ रोवणारा हा शिमगोत्सव ‘लोकमान्य’चे संस्थापक आणि ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. शनिवार एक एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाकडून सिंधुदुर्ग शिमगोत्सव मिरवणुकांना  प्रारंभ होणार आहे. तर समारोप रात्री 8.30 वाजता जिमखाना मैदानावरील  कार्यक्रमाने होणार आहे. 

 ‘लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी’ पुरस्कृत आणि ‘तरुण भारत’, ‘क्वेस्ट टुर’, लोकमान्य एज्युकेशन कोकण विभाग आयोजित या शिमगोत्सवात गोवा आणि सिंधुदुर्गातील लोककला पथके विविध कलांचे सादरीकरण करणार आहेत. दोन्ही राज्यातील सुमारे दोन हजार कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत.

  जिमखाना मैदानावर होणाऱया मुख्य कार्यक्रमाला ‘लोकमान्य’चे संस्थापक आणि ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे, नीतेश राणे, वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजीत देसाई, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकिता सावंत उपस्थित राहणार आहेत.

 कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सव पिढय़ान्पिढय़ा रुढीपरंपरेनुसार साजरा केला जातो. हा शिमगोत्सव येथील विविध कलांचे यथार्थ दर्शन घडवितो. येथील अनेक गावांमध्ये वैशिष्टय़पूर्ण रोंबाट निघतात. गोवा आणि कोकणातील या लोककलांचा संगम साधून सिंधुदुर्गात प्रथमच शिमगोत्सव होत आहे. स्थानिक लोककलांना प्रोत्साहन आणि गोव्यातील लोककलांचे दर्शन या हेतूने हा उत्सव होत आहे. या उत्सवानिमित्त गोव्याची संस्कृती व लोककला प्रथा जवळून पाहण्याचा योग आला आहे. शिमगोत्सव मिरवणुकांचा शुभारंभ नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.

 शिमगोत्सवात गोवा-सावर्डे येथील शिमगोत्सव पथक 300 कलाकारांसह तर कुंभारजुवे येथील ब्रह्मेश्वर युवक संघ 150 ते 170 कलाकारांसह सहभाग घेणार आहे. म्हापसा येथील शिमगोत्सव पथक 150 कलाकारांसह सहभागी होणार आहे. मोरजी येथील सातेरी महाळसा, म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर कला मंडळ, खोर्ली तिसवाडी येथील श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब यांची चित्ररथ पथकेही सहभागी होणार आहेत. तसेच 60 कलाकारांचे घोडेमोडणी पथकही सहभाग घेणार आहे.

 सिंधुदुर्ग शिमगोत्सवात स्थानिक लोककला कलाकारांचा सहभागही राहणार आहे. नेरुर येथील साईचे टेंब कलेश्वर कला समूहातर्फे अण्णा मेस्त्राr पथक, विलास मेस्त्राr पथक, बाबा मेस्त्राr पथक, दिनू मेस्त्राr पथक यांचीही अनोखी अदाकारी पाहता येणार आहे. कणकवली येथील 25 जणींचे कनकसंस्कृती महिला ढोलपथकही सहभागी होणार आहे.

 याशिवाय रात्री सात वाजता जिमखाना मैदानावर सावंतवाडी येथील श्री परमेश्वर  प्रोडक्शन निर्मित कोकणातील लोककलांवर आधारित कार्यक्रम ‘कोकणची लोकधारा’ सादर होणार आहे. बाळ पुराणिक निर्मित या कार्यक्रमात 35 कलाकारांचा सहभाग आहे.

 कोकणात शिमगोत्सवाची धामधूम संपली आहे. मात्र, शिमगोत्सवात सादर होणारे लोककला प्रकार दुर्लक्षित राहतात. त्यांना चालना मिळावी तसेच पर्यटनदृष्टय़ा या लोककलांच्या माध्यमातून रोजगार मिळावा, यासाठी ‘सिंधुदुर्ग शिमगोत्सव’ आयोजित केला आहे.