|Saturday, June 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बाजूपट्टीसह रस्ता तब्बल 14 मीटरचा होणार, -पश्चिम महाराष्ट्र-कोकण अधिक येणार जवळ

बाजूपट्टीसह रस्ता तब्बल 14 मीटरचा होणार, -पश्चिम महाराष्ट्र-कोकण अधिक येणार जवळ 

राजेंद्र शिंदे /चिपळूण :

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया चिपळूण-कराड नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली असतानाच आता गुहागर-विजापूर हा राज्यमार्गही राष्ट्रीय महामार्गात रूपांतरीत होत आहे. या नव्या राष्ट्रीय महामार्गासाठी एन. एच. 166 ई या क्रमांकासह नवी ओळख मिळाली आहे. महामार्गाच्या रूंदीकरणासाठी कराड ते गुहागर या 139 कि. मी. अंतरासाठी तीन टप्पे करण्यात आले असून त्यातील दोन टप्प्यांसाठी 630 कोटीच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. हा रस्ता बाजूपट्टीसह एकूण 14 मीटरचा होणार असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे दळणवळणासाठी अधिक जवळ येणार आहेत.

गेल्यावर्षी रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या शुभारंभाला आलेल्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी रेवस-रेड्डी सागरी मार्गासह गुहागर-विजापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले हे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. याबाबतची अधिसूचना जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भातील प्रक्रिया वर्षभरात पूर्णत्वास गेली असून w1 एप्रिलपासून नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून गुहागर-विजापूर उदयास येत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गुहागर-विजापूर महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यानंतर त्याची अंतिम मंजुरी दोन महिन्यांपूर्वीच मिळाली. त्यामुळे आता 138.86 कि. मी. लांबीच्या या मार्गाची देखभाल व दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी होणार आहे. यामध्येच कराड आणि गुहागरमध्ये काहीठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण झालेले आहे. उर्वरित भागात सध्या हा महामार्ग दुपदरी आहे.

नव्या राष्ट्रीय महामार्गासाठी कराड ते हेळवाक, हेळवाक ते चिपळूण आणि चिपळूण ते गुहागर अशा तीन टप्प्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कराड ते हेळवाक आणि चिपळूण ते गुहागर या दोन टप्प्यातील रस्ता रूंदीकरणासाठी सुमारे 650 कोटीच्या निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. हेळवाक ते चिपळूण यादरम्यान कोकणातील सर्वाधिक अवघड वळण असलेला कुंभार्ली घाट येत असून घाट रस्त्यावरील डोंगराळ भागात कातळाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या घाटातील वेडीवाकडी वळणे काढून सरळ रस्ता करण्याच्यादृष्टीने शक्य तेवढे प्रयत्न केले जात असून त्यानुसार अंदाजपत्रक तयार केले जात आहे.

महामार्ग रूंदीकरणात रस्ता धावपट्टीही साधारणपणे 10 मीटरची राहणार असून बाजूपट्टय़ा दुतर्फा प्रत्येकी दोन मीटरच्या असणार आहेत. भविष्यात संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली असल्याने त्यादृष्टीने या रस्त्याची आखणी केली जात आहे. त्याचबरोबर आवश्यक त्याठिकाणी पूल उभे करावे लागणार आहेत. दरम्यान, हस्तांतरणानंतर चौपदरीकरणासाठी लवकरच जमीन अधिग्रहण करण्याच्यादृष्टीने पावले टाकली जाणार आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जामुळे विशेष म्हणजे या महामार्गाने कोकण, विजापूरशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दळणवळणाला अधिक चालना मिळणार असून चौपदरीकरणामुळे या मार्गावरील जमिनींना सोन्याचा भाव येणार आहे. अनेक गावे महामार्गावर येणार असल्याने त्यांचाही विस्तार होणार आहे.

 

Related posts: