|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सपच्या अंतर्गत कलहामुळे मोदींना लाभ : मुलायमसिंग

सपच्या अंतर्गत कलहामुळे मोदींना लाभ : मुलायमसिंग 

माजी मुख्यमंत्री अखिलेश यांना पुन्हा एकदा केले लक्ष्य

वृत्तसंस्था/ मैनपुरी

सपचे माजी अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर पहिल्यांदाच अखिलेश यांच्याविरोधात वक्तव्य केले आहे. “जो मुलगा आपल्या वडिलांचा होऊ शकत नाही, तो कोणाचाही होऊ शकत नाही असे मोदींनी म्हटले होते. अखिलेश यांनी मोदींना असे वक्तव्य करण्याची संधी दिली तसेच पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्यांना त्याचा लाभ झाला’’ असा दावा मुलायम यांनी केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षातील कलह समोर आला होता. पक्षाची धुरा अखिलेश यांनी आपल्या हातात घेतली होती. मुलायम यांना पक्षाचा मार्गदर्शक बनविण्यात आले. तर शिवपाल यादव यांना उत्तरप्रदेश सप अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. यामुळे शिवपाल गट नाराज झाला होता. यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला 325 जागा तर सपला फक्त 47 जागा मिळाल्या होत्या.

माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा अपमान होता. अखिलेशने आपल्या काकांनाच मंत्रिपदावरून हटविले. कौटुंबिक भांडणाचा लाभ मोदींना झाला. कोणताही पिता आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवत नाही, परंतु मी ते केले. देशात कोणत्याही नेत्याने असे धाडस दाखविले नाही असा दावा मुलायम यांनी केला.

अखिलेशजवळ बुद्धी आहे, परंतु मते मिळविण्याची क्षमता नाही. अखिलेशने अशा काँग्रेसबरोबर आघाडी केली, ज्या पक्षाने माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्ले करविले होते. मी आता अखिलेश याच्या नाही तर जनतेच्या विश्वासावर राहिन असे वक्तव्य त्यांनी केले. सपने राज्यातील निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी केली होती, परंतु आघाडीचा निर्णय पक्षावर उलटल्याचे बोलले जाते.

अयोध्याप्रकरणी प्रतिक्रिया

अयोध्या-बाबरी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मानावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातून हटू नये असे आवाहन करत असल्याचे मुलायम यांनी म्हटले. अयोध्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीची तयारी दर्शविली आहे.

Related posts: