|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ईव्हीएम मशीनमधून ‘कमळा’चीच पावती

ईव्हीएम मशीनमधून ‘कमळा’चीच पावती 

मध्यप्रदेशमधील भिंडमध्ये प्रकार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्य प्रदेश राज्यातील भिंड मतदारसंघात मतदान मशीनच्या (‘व्होटर व्हेरिफीबल पेपर ऑडिट ट्रायल’) चाचणीवेळी केवळ कमळ या चिन्हाचीच पावती मिळाली.  यामुळे मतदान मशीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकाराची वाच्यता केल्यास अटक करू, अशी धमकी निवडणूक निर्णय अधिकाऱयाने प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिला आहे.

 भिंड मतदारसंघात 9 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मतदानाआधी नियमानुसार ‘ईव्हीएम’ मशीनची चाचणी घेण्यात आली. यावेळी दोनवेळा भाजपचे चिन्ह असणाऱया कमळाचीच पावती आली. तर तिसऱयांदा काँग्रेसचे चिन्ह असणाऱया ‘पंजा’ची पावती मिळाली. याबाबत प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. मतदान मशीन योगरीत्या सुरू झाले नव्हते, त्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा निवडणूक अधिकारी सलीना सिंह यांनी केला. तसेच याप्रकरणाची वाच्यता केल्यास अटक करू, अशी धमकीही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या
प्रतिनिधींना दिली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. सलीना सिंह यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींची माफी मागवी, अशी मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकारचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आला आहे.

 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळले. तब्बल 325 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. यावेळी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी ईव्हीएम मशीनमधील गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र आयोगाने त्यांचे आरोप फेटाळले होते. आता मध्य प्रदेशमधील प्रकारामुळे पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.