|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » पीव्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक

पीव्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची आघाडीची बॅडमिंटन तारका पीव्ही सिंधूने शनिवारी इंडिया सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. या स्पर्धेत महिला एकेरीतील उपांत्य लढतीत तिने सूंग जी हय़ून हिचा 76 मिनिटांच्या संघर्षमय लढतीत 21-18, 14-21, 21-14 अशा फरकाने पराभव केला. आता अंतिम लढतीत सिंधूची लढत स्पेनच्या कॅरोलिन मारिनविरुद्ध होणार असून ही रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटन फायनलचा ‘शो-डाऊन’ असणार आहे. अन्य एका उपांत्य लढतीत मारिनने जपानच्या अकाने यामागुची हिचा 21-16, 21-14 असा पराभव केला.

शनिवारी रंगलेल्या उपांत्य लढतीत सिंधूने पहिला गेम 21-18 अशा निसटत्या फरकाने जिंकला. मात्र, दुसऱया फेरीत सूंगने जोरदार मुसंडी मारली. वास्तविक, सिंधूने येथे एकवेळ प्रारंभी 5-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, नंतर तिला यात सातत्य राखता आले नव्हते. सूंगने कोर्टवरील खुल्या जागा हेरत सिंधूला सातत्याने नामोहरम केले. सिंधूला कोर्टच्या चौफेर धावावे लागेल, यावर तिने बऱयापैकी लक्ष केंद्रित केले. अर्थात, 21 वर्षीय सिंधूने तिसऱया व निर्णायक गेममध्ये 21-14 असा एकतर्फी विजय संपादन केला. यावेळी तिने ओव्हरहेड स्मॅशेसवर प्रामुख्याने भर दिला. यामुळे, दुसऱया गेममधील पराभव हा तिच्यासाठी फक्त ‘वेक-अप कॉल’ ठरला.

तिसऱया गेममध्ये उभयतांनीही लाँग रॅलीजवर भर दिला होता. घरच्या चाहत्यांचे पाठबळ लाभलेल्या सिंधूने येथे 11-4 अशी जोरदार आघाडी घेतली. मात्र, सूंगने अचानक आपला खेळ उंचावत ही आघाडी चक्क 12-10 अशी कमी केली. पण, येथून पुढे निर्णायक टप्प्यात सिंधूने सूंग हय़ूनवर एककलमी वर्चस्व प्रस्थापित केले. सूंगची एक सर्व्हिस अतिशय कमकुवत होती. त्यावर गुण वसूल केल्यानंतर सिंधूला मागे वळून पाहावे लागले नाही. एकीकडे, सूंगने भेदक स्मॅशेसवर भर दिला तर दुसरीकडे, सिंधूने ड्रिबल गेमच्या बळावर सूंगवर मात केली. सूंगच्या एका फटक्यावर शटल नेटमध्ये सापडल्यानंतर सिंधूच्या देदीप्यमान विजयावर शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, सिंधू व कॅरोलिना मारिन अंतिम फेरीत खेळणार हे निश्चित झाले असून या उभयतांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आमनेसामने भिडण्याची ही रिओ ऑलिम्पिकनंतर दुसरी वेळ ठरणार आहे. यापूर्वी दुबई वर्ल्ड सुपरसिरीजमध्ये शेवटची लढत झाली, त्यावेळी सिंधूने मारिनविरुद्ध रिओ ऑलिम्पिकमधील पराभवाचा वचपा काढला होता. तीच पुनरावृत्ती सिंधू येथेही करणार का, याबद्दल आता औत्सुक्य असेल.