|Sunday, September 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सकाळीच बैठक बोलवली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तब्बल सव्वा अकराच्या सुमारास परभणीवरुन संघर्ष यात्रेतून थेट जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना फोनवरुन नावे दिली जातात. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतीपदांचे अर्ज भरण्यास पाठवण्यात आले. पीठासन अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाहीर केले. शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदी राजेश पवार, कृषी सभापतीपदी मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापतीपदी वनिता गोरे आणि समाजकल्याण सभापतीपदी शिवाजी सर्वगौड यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदारांची मुंबईत बैठक झाली होती. त्या बैठकीत झालेला निर्णय मात्र सर्वच उपस्थित आमदारांनी गुलदस्त्यात ठेवला होता. आजच्या सभापतीनिवडीसाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सहीचे व्हीप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पोहचले होते. त्यानुसार सकाळी 9 वाजल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर यायला लागले. 10.20 वाजण्याच्या सुमारास आमदार बाळासाहेब पाटील व मानसिंगराव जगदाळे हे आले. त्यानंतर आमदार मकरंद पाटील आणि खंडाळा तालुक्यातील ज्येष्ठ दत्तानाना ढमाळ, मनोज पवार हे आले. खटावचे प्रभाकर घार्गे, नितीन राजगे, तर माणचे शेखर गोरे आणि रेसमध्ये असलेल्या भारती पोळ आणि सोनाली पोळ याही आल्या. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर हे सर्वात अगोदर अध्यक्षांच्या बंगल्यावर होते.

प्रत्यक्ष बैठकीला 11 वाजता सुरुवात झाली. तत्पूर्वी राजकुमार पाटील यांनी अर्ज तयार करुन त्यावर सूचकांच्या सह्या घेवून ठेवल्या होत्या. त्यामध्ये मान्यवरांनी भाषणे केली. दरम्यान, सुनील माने यांना परभणीवरुन राज्याचे राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांचा फोन आला. त्यांनी नावे सांगितली त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे यांनी नावे लिहून ती जाहीर केली. त्या सदस्यांना ते अर्ज दिले गेले. जिल्हा परिषदेत अर्ज भरले. पीठासन अधिकारी भारत वाघमारे यांनी दुपारी 2 वाजता सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवडी झाल्याचे जाहीर केले. मनोज पवार यांना मंगेश धुमाळ, राजेश पवार यांना प्रदीप विधाते, वनिता गोरे यांना भावना सोनवलकर तर शिवाजी सर्वगौड यांना उषादेवी गावडे हे सूचक झाले. निवडी झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 

Related posts: