|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » झी नाटय़गौरव पुरस्कारांवर अमर फोटो स्टुडिओची छाप

झी नाटय़गौरव पुरस्कारांवर अमर फोटो स्टुडिओची छाप 

मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाटय़ गौरव सोहळा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह अमर फोटो स्टुडिओ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळय़ाकाठी’ या नाटकाने मिळविला. यंदाचा विशेष लक्षवेधी नाटकाचा पुरस्कार कोडमंत्र नाटकाने मिळवला. प्रायोगिक नाटकांमध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट नाटकासहित आठ पुरस्कार मिळवित ‘हे राम’ या नाटकाने बाजी मारली.

या सोहळय़ाचा परमोच्च क्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार प्रदानाचा. आपल्या संवेदनशील आणि प्रगल्भ अभिनयाने मराठी रंगभूमीला एकाहून एक सरस नाटय़कृती देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना झी नाटय़ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी तीन पायांची शर्यत, कोडमंत्र, एक शून्य तीन, मग्न तळय़ाकाठी, अमर फोटो स्टुडिओ या नाटकांनी विविध विभागांत नामांकने मिळवित स्पर्धेत रंगत आणली होती. यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शर्वरी लोहकरे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय पेंकरे असे महत्त्वाचे पुरस्कार पटकावित तीन पायांची शर्यत या नाटकाने सोहळय़ावर आपली छाप सोडली. प्रायोगिक नाटकांत सर्वोत्कृष्ट अभिनेता निशांत कदम, अभिनेत्री तेजस्वी परब, दिग्दर्शक राम दौंड आणि सर्वोत्कृष्ट नाटक या महत्त्वाच्या पुरस्कारांसह इतर चार पुरस्कारांवर आपले नाव कोरत हे राम नाटकाने एकहाती बाजी मारली.

 बॅरिस्टर, वाहतो ही दुर्वांची जुडी, महासागर, जास्वंदी, कमला आणि मकरंद राजाध्यक्ष अशा एकाहून एक सरस आणि दर्जेदार नाटकांमधून आपल्या सशक्त अभिनयाचा नजराणा नाटय़रसिकांना देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते नाटय़ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विक्रम गोखले म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी नाटकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी मी अभिनयापासून दूर झालेलो नाही. चित्रपट आणि टीव्ही मालिका या माध्यमांतून मी तुमच्या भेटीला येत राहीन. माझ्यातील अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मला सतत काम करायलाच पाहिजे आणि ते मी शेवटच्या श्वासापर्यंत करेन. आज विविध नामांकित विद्यापीठे आणि कलेशी निगडीत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे काम मी करत आहे. तिथे असलेले विद्यार्थी असो की आता माझ्यासमोर बसलेले तुमच्यासारखे आजच्या पिढीतील नव्या दमाचे कलाकार असो या सर्वांबद्दल मी प्रचंड आशावादी आहे, अशा भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या.

व्यावसायिक नाटक

सर्वोत्कृष्ट वेशभूषा : कल्याणी कुलकर्णी गुगळे (अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा : शरद सावंत (मग्न तळय़ाकाठी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : रोहित प्रधान (एक शून्य तीन)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : शीतल तळपदे (अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट नेपथ्य : प्रदीप मुळय़े (तीन पायांची शर्यत)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पूजा ठोंबरे (अमर फोटो स्टडिओ)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सिद्धेश पुरकर (अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : सखी गोखले (अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : सुव्रत जोशी (अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : शर्वरी लोहकरे (तीन पायांची शर्यत)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : संजय नार्वेकर (तीन पायांची शर्यत)

बेस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर : मुक्ता बर्वे (कोडमंत्र)

सर्वोत्कृष्ट लेखन : मनस्विनी लता रविंद्र (अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विजय पेंकरे (तीन पायांची शर्यंत)

सर्वोत्कृष्ट नाटक : अष्टविनायक व जिगिषा (मग्न तळय़ाकाठी)

विशेष लक्षवेधी नाटक : अनामिका व रसिका (कोडमंत्र)

सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक : अमर फोटो  स्टुडिओ (सुबक)

 

प्रायोगिक नाटक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ऋता पंडित – MH 12 J 16

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : उदय बराध्ये (हे राम)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तेजस्वी परब (हे राम)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : निशांत कदम (हे राम)

सर्वोत्कृष्ट लेखक : शार्दुल सराफ (जनक)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राम दौंड (हे राम)

सर्वोत्कृष्ट नाटक : विजिगीषा फाउंडेशन, कल्याण (हे राम)

विशेष लक्षवेधी नाटक : आरलीन प्रोडक्शन्स पुणे (अपूर्व मेघदूत)

 

Related posts: