|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बेंगळुरात 9 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

बेंगळुरात 9 कोटींच्या जुन्या नोटा जप्त 

प्रतिनिधी/ बेंगळूर

बंदी असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेते आणि विधान परिषद माजी सदस्य विरण्णा मत्तीकट्टी यांच्या जावयासह 14 जणांना बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 कोटी 10 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. गेल्या आठवडय़ात बेंगळूरमध्ये 5 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्याची घटना घडलेली असतानाच रविवारी 9.10 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विधान परिषद माजी सदस्य विरण्णा मत्तीकट्टी यांचे जावई प्रवीणकुमार (वय 43) यांचा समावेश आहे.

बेंगळूरच्या जे. सी. नगरमधील बेन्सन टाऊन येथील बंगल्यामध्ये जुन्या नोटांच्या मोबदल्यात नव्या नोटा बदलून देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच्या आधारे बेन्सन टाऊन येथील मिल्लर रोडवरील बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा असणारे 9 कोटी 10 लाख रुपये, 15 मोबाईल, 2 कार, 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

बेंगळूर शहर गुन्हे विभागाचे अप्पर आयुक्त एस. रवि यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी एच. डी. आनंदकुमार, सीसीबीचे एसीपी एच. एम. महादेवप्पा, पोलीस निरीक्षक डॉ. सुधाकर, एम. स. रविकुमार, बी. राजू, आर. भानुप्रसाद यांनी ही कारवाई केली.