|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नोटांवरील सुरक्षा चिन्ह तीन ते चार वर्षांनी बदलणार

नोटांवरील सुरक्षा चिन्ह तीन ते चार वर्षांनी बदलणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बनावट नोटांवर आळा घालण्यासाठी दर तीन ते चार वर्षांनी पाचशे व दोन हजारांच्या नोटांवरील सुरक्षा चिन्हांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. नोटाबंदीनंतर मागील चार महिन्यांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटा सापडल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर अर्थ व गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या संयुक्त बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला.

  नोटांच्या सुरक्षा चिन्हात बदल करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीवेळी केंद्रीय गृह सचिव राजीव मेहर्षी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विकसित देशांमध्ये दर तीन ते चार वर्षांनी नोटांवरील सुरक्षा चिन्हे बदलली जातात. भारतातही याचप्रमाणे निर्णय झाल्यास बनावट नोटांना चाप बसेल, त्याचबरोबर नोटा अधिक सुरक्षित राहतील, असा विश्वास अधिकाऱयांनी यावेळी व्यक्त केला.

  देशात दहा वर्षांहून अधिक काळ नोटांमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. 1987 मध्ये पाचशे रुपयांची तर एक हजाराची नोट 2000 साली बाजारात आली. यावरील सुरक्षा चिन्ह दहा वर्षांहून अधिक काळ राहिले. त्यामुळे बनावट नोटांमध्येही तीच सुरक्षा चिन्हे दिसत होती. नुकत्याच पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या होत्या. यामध्ये 17 सुरक्षा चिन्हापैकी 11 सुरक्षा चिन्हे हुबेहुब होती. यामध्ये वॉटरमार्क, नोटेमधील पारदर्शक भाग, अशोक स्तंभ, डाव्या बाजूला लिहिण्यात आलेले दोन हजार हे शब्द, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी, नोटेची देवनागरीमध्ये लिहिलेली किंमत, स्वच्छ भारत आणि मंगळयान या सर्व चिन्हांची हुबेहुब नक्कल करण्यात आल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दर तीन ते चार वर्षांनी नोटांवरील सुरक्षा चिन्हे बदलल्यास बनावट नोटांना चाप बसेल, असा विश्वास अर्थ व गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

                  पाकिस्तानमध्ये बनावट नोटांची निर्मिती

नोटाबंदीनंतर पाकिस्तानमध्ये मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटा निदर्शनास आल्या. त्यानंतर नवीन दोन हजार रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय ही बनावट नोटांच्या निर्मितीमध्ये सक्रिय आहे. तसेच बांगलादेशमधून या नोटा भारतात येतात, असेही तपासात स्पष्ट झाल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात तब्बल 400 कोटींच्या बनावट नोटा असल्याचे कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले होते.

Related posts: