|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘मनरेगा-फौजदारा’r पोलीस यंत्रणेचे ‘जाणीवपुर्वक’ दुर्लक्षच…!

‘मनरेगा-फौजदारा’r पोलीस यंत्रणेचे ‘जाणीवपुर्वक’ दुर्लक्षच…! 

विनायक जाधव

सांगली

 शासनाने दुष्काळी जनतेच्या हाताला काम मिळावे, पावसाचे पाणी थांबून परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी. या अतिशय चांगल्या उद्देशाने निर्माण केलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेला मात्र भ्रष्ट यंत्रणेची किड लागली. या भ्रष्ट यंत्रणेला काही स्थानिक राजकीय मंडळीनी वरदहस्त दिल्याने या चांगल्या योजनेचे वाटोळे जत तालुक्यात काही गावात झाले. यातून शासनाचा पैसा हडप करण्यात आला. जत तालुक्यातील एकोंडी आणि काशिलिंगवाडी या दोन ठिकाणी मनरेगामधून करण्यात आलेल्या शेततलाव आणि मातीनाला बांधकामप्रकरणी एकूण 36 लाख 74 हजार रूपयांचा अपहार झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेने शोधून काढली. या प्रकरणांत तत्कालिन बीडीओ. सध्याचे प्रभारी बीडीओ यांच्यासह एकूण 12 जणांच्यावर थेट फौजदारी जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली. पण या फौजदारीकडे पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष असून संबंधितांना गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी हात सुध्दा लावला नाही.

 जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भोसले यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र आडसुळ यांच्यामार्फत 15 फेब्रुवारीच्या दरम्यान हा फौजदारी गुन्हा पोलीसांत दाखल करण्यात आला आहे. पण पोलीसांनी या सर्व दोषींना अभय दिले आहे अशीच सध्याची परिस्थिती आहे. पोलीस यंत्रणेकडून या 12 जणांच्याबाबतीत जाणीवपुर्वक अभय देण्याचे कारण कोणते आहे याचा उलगडा अद्यापही करण्यात आला नाही.

जत तालुक्यातील एकोंडी, काशिलिंगवाडी आणि बाज या तीन ठिकाणी मनरेगा कामात मोठा घोटाळा झाल्याने याप्रकरणी  सीईओ डॉ. राजेंद्र भोसले एक प्रशासकीय चौकशी समिती नेमली होती. या समितीमध्ये  समितीचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, मुख्य लेखा व वित अधिकारी राजेंद्र गाडेगर, जतचे तहसिलदार अभिजीत पाटील, पाणीपुरवठा अभियंता आर.एस.बारटक्के, आणि या समितीचे सचिव म्हणून रवींद्र आडसुळ यांनी काम पाहिले.  या सर्व वरिष्ठ अधिकाऱयांनी सर्व दप्तर तपासणी करून या प्रकरणांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या सीईओच्याकडे दिल्यानंतर याप्रकरणी सीईओंनी तातडीने कडक कारवाई करण्याचे पाऊल उचलले. त्यांनी त्यांच्या अखत्यिरित येणाऱया सर्व कर्मचाऱयांचे निलंबन केले. तर सेवानिवृत्त बीडीओ ओमराज गहाणे आणि प्रभारी बीडीओ ज्ञानदेव मडके यांच्या निलंबनाबाबत विभागीय आयुक्तांच्याकडे प्रस्ताव पाठवला.

एकोंडीत एकही शेततलाव न काढता 24 लाख 19 हजार रूपये खर्च केले

 जत तालुक्यात एकेंडी येथे प्रत्यक्षात कोणताही शेततलाव न करता 13 हून अधिक शेततलाव काढण्यात आले असे दाखवून 24 लाख 19 हजार रूपयांचा अपहार करण्यात आला आहे. ही कामे सर्व कागदोपत्री दाखवून हा अपहार करण्यात आला आहे. एकेंडी गावात वार्षिक कृती आराखडा कार्यक्रमात कोणतीही कामे करणचे आदेश नव्हते. तसेच या गावात कोणतेही शेततळे असावे अशी मागणी नव्हती. प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजूरी नव्हती. त्याचे कोणतेही रजिस्टर नव्हते. पण या गावात 13 हून अधिक शेततलाव काढण्यात आले. ही शेततळे कामगारांच्या मार्फत काढले आहेत. याठिकाणी 270 कामगार उपस्थित होते. या कामगारांचे रजिस्टर तयार करण्यात आले. तसेच त्यांचे पगारपत्रक तयार करण्यात आले. त्यांच्या नावाने रक्कमा पाठविण्यात आल्या आहेत. आणि त्या रक्कमा त्या मजूरांनी विविध प्रकारे काढल्या आहेत. पॉझ मशीन, एटीएम आणि व्हॉवचर व्दारे या रक्कमा त्यांनी काढल्या आहेत. असे रेकॉर्ड तयार करून या रक्कमा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 24 लाख 19 हजार रूपयांचा अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी तत्कालिन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, सध्याचे प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, कनिष्ठ लेखधिकारी प्रवीण माने, पाच डाटा एंट्री ऑपरेटर या सर्वांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काशिलिंगवाडी येथे जुन्याच मातीनाल्याला रंगरंगोटी केली

जत तालुक्यातील काशिलिंगवाडी येथे पुर्वी चार मातीन नाल्याची कामे करण्यात आली होती. या ठिकाणी जुन्याच कामावर मशिनने हे काम फोडून त्याची रंगरंगोटी करून नवीन कामे केली आहेत असे दाखवून शासनाची फसवणूक करत या कामावर 12 लाख 55 हजार रूपये उचलण्यात आले आहेत. या गावात मातीनाल्याचे काम करावे अशी कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीने तसा ठराव ही करून दिला नाही. किंवा ही जुनी मातीनाला दुरूस्त करा असेही सांगितले नाही.  या नालाबांधकामांची प्रशासकीय मान्यता तयार करण्यात आली  तसेच तांत्रिक मान्यता कृषि अधिकारी कैलासकुमार मारकन यांनी दिले त्यानंतर या जुन्या कामाचा खर्च दाखवून 12 लाख 55 हजार रूपये संगनमताने उचलण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सहा जणांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तत्कालिन गटविकास अधिकारी ओमराज गहाणे, सध्याचे प्रभारी  गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, तालुका कृषि अधिकारी कैलासकुमार मारकम, सरपंच एन.डी.बजबळे, ग्रामसेवक सरग, ग्रामरोजगार सेवक देवांग यांच्यावर फौजदारी दाखल केली आहे.