|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरणाचा मुहुर्त टळला

पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरणाचा मुहुर्त टळला 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने ‘पॉस’ मशीनचा शुभारंभ 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा चंग बांधला होता. पण या अंमलबजावणीसाठी सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची तसेच कार्यवाहीसाठी ‘पॉस’ मशीनचेही वाटप लांबणीवर गेले असल्याने या योजनेचा मुहुर्त अखेर लांबणीवर गेला आहे.

जिल्हा पुरवठा विभागाने धान्य वितरण व्यवस्थेत एक नवे पाऊल टाकले आहे. वितरण व्यवस्थेतील काळा बाजार रोखण्यासाठी ‘पॉस’ मशीनचा वापर प्रायोगिक तत्वावर रत्नागिरीत दोन ठिकाणी सुरू केला आहे. 1 एप्रिलपासून जिल्ह्य़ात सर्वत्र पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याची अंमलबजावणी होणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. रेशनकार्ड प्रमुखाने थम (अंगटा) दिल्यानंतरच त्याला धान्य रेशन दुकानांमधून मिळणार आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यासाठी आधारकार्डाशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जिल्हय़ात आधारकार्ड लिंक करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. मार्च महिन्याच्या प्रारंभाला हे काम 61 टक्के पूर्णत्वाकडे गेले होते. ‘पॉस’ मशीनचा वापर प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी तालुक्यातील गोळप-धोपटवाडी आणि रत्नागिरी शहरातील रास्त धान्य दुकान क्र. 12 वर वितरण व्यवस्था सुरू करण्यात आली. अनेकवेळा धान्याची उचल झाल्यानंतर संबधित दुकानधाराने किती धान्य वितरित केले, किती शिल्लक वितरण आहे, याची माहिती समोर येत नव्हती. धान्य वितरणात रेशन दुकानांवर चालणारा काळा बाजार रोखला जावा, यासाठी पुरवठा विभागाने पाऊल उचलले.

त्यामुळे काळय़ा बाजारने धान्याची विक्री वाढली, धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी आधारकार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दारिद्रय़रेषेखालील कार्डधारकांना पॉस मशीनवर थम (अंगठा) दिल्यास त्याची सर्व माहिती मिळणार आहे. त्यानंतरच धान्य वितरित केले जाईल. यामुळे खऱया अर्थाने लाभार्थ्याला धान्य मिळणार आहे. ही माहिती पुरवठा विभागाला प्राप्त होणार असल्याने लाभार्थ्यांचा शिल्लक साठा लक्षात घेत पुढील महिन्यातील धान्याचे वितरण दुकानदाराला दिले जाणार आहे.

नियोजनाची कार्यवाही अद्यापही अपूर्णच

जिल्हय़ात 850 रेशन दुकाने आहेत. सुमारे 23 हजार 968 शिधापत्रिकाधारक आहेत. शिधापत्रिकांवरील लोकसंख्या सुमारे 18 लाख 28 हजार 551 इतकी आहे. आधार नोंदणीसाठी वितरित करण्यात आलेल्या अर्जानुसार 3 लाख 70 हजार 488 कार्डधारकांनी अर्ज भरून दिले आहेत. उर्वरित 52 हजार 139 अर्ज संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र या धान्य वितरण व्यवस्थेची 1 एप्रिलपासून अंमलबजावणीची कार्यवाही होणार होती. पण अजूनही त्या बाबत नियोजनाची कार्यवाही पूर्णत्वाकडे न गेल्याने शनिवारचा मुहुर्त लांबणीवर गेला आहे.

Related posts: