|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » क्रिडा » पीव्ही सिंधूची जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी झेप

पीव्ही सिंधूची जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी झेप 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडियन ओपन सुपरसीरिज स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. सिंधूचे हे कारकिर्दीतील सर्वोच्च मानांकन आहे. चिनी तैपेईची तेई तेझु यिंग अग्रस्थानी कायम असून स्पेनच्या कॅरोलिना मारीनची तिसऱया स्थानी घसरण झाली आहे. सायनाच्या क्रमवारीत मात्र कोणताही बदल झाला नसून ती आठव्या स्थानी कायम आहे.

मंगळवारी जागतिक बॅडमिंटन महासंघाने ताजी क्रमवारी जाहीर केली. इंडियन ओपन स्पर्धा होण्याआधी स्पेनची ऑलिम्पिक विजेती मारीन दुसऱया स्थानी विराजमान होती. मात्र, इंडियन ओपन सुपरसीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने 21-19, 21-16 असा दमदार विजय प्राप्त करताना या वर्षात मारीनला दुसऱयांदा नमवण्याची किमया साधली. शिवाय, सिंधूने ऑलिम्पिकमधील पराभवाचा वचपाही यावेळी काढला. या कामगिरीचा सिंधूला फायदा झाला असून तिच्या खात्यात 9200 गुणांची भर पडली आहे. उपजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या मारीनला 7800 गुणांचा फायदा झाला आहे.

ताज्या क्रमवारीत सिंधूचे 75,759 गुण झाले असून ती दुसऱया स्थानी विराजमान झाली आहे. दुसऱया स्थानी असणाऱया कॅरोलिना मारीनला एका स्थानाचा फटका बसला असून ती आता 75,664 गुणासह तिसऱया स्थानी आहे. चिनी तैपेईची तेई तेजु यिंग 87,911 गुणासह अव्वलस्थानी विराजमान आहे. सिंधू आता आजपासून सुरु होणाऱया मलेशियन ओपन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तिला क्रमवारीत अग्रस्थान प्राप्त करण्याची नामी संधी आहे. सायना नेहवाल 65, 612 गुणासह आठव्या स्थानी कायम आहे.

पुरुष गटात मलेशियन स्टार ली चोंग वेई अग्रस्थानी कायम असून डेन्मार्कचा जॉर्गन्सन दुसऱया तर चीनचा चेन लाँग तिसऱया स्थानी आहे. भारताच्या अजय जयरामची तीन स्थानानी घसरण झाली असून तो आता 19 व्या स्थानी आहे. एचएस प्रणय 25 व्या स्थानी आहे.

Related posts: