|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सांगलीचा दुर्मीळ रक्तदाता बनला रत्नागिरीतील मातेसाठी ‘देवदूत’!

सांगलीचा दुर्मीळ रक्तदाता बनला रत्नागिरीतील मातेसाठी ‘देवदूत’! 

सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी

आपल्यापैकी बहुतेकांना ओ, बी, ए, पॉझिटीव्ह व निगेटीव्ह ब्लड ग्रुप माहित आहेत, मात्र जगात दुर्मीळ असणारा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ अनेकांना माहितही नसेल. या बॉम्बे ब्लड ग्रुपची महिला रत्नागिरी शासकीय रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. 6 ग्रॅम हिमोग्लोबीन असणाऱया या महिलेला त्वरित रक्त पुरवणे गरजेचे होते, मात्र तिचा ब्लड ग्रुप समजल्यावर सगळय़ांचीच झोप उडाली. अनेकांनी यासाठी सोशल मिडियाचा आधार घेतला योगायोगाची गोष्ट म्हणजे सांगलीतील या बॉम्बे ब्लड ग्रुपच्या तरुणाने या तरुणाने ही माहिती कळताच वाहनाची वाट न पाहता स्वत:च्या दुचाकीवरुन रत्नागिरी गाठली. देवदूत बनून आलेल्या या तरुणाने या मातेसह अपत्यालाही नवसंजीवनी बहाल केली. रत्नागिरी शासकीय रूग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली.

अंजली हेळकर ही चिरेखाणीवर काम करणारी महिला आपल्या पहिल्याच प्रसुतीसाठी 2 दिवसांपूर्वी शासकीय रूग्णालयात दाखल झाली. तिच्या प्राथमिक तपासण्यांमध्ये तिचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटीव्ह आढळले. ओ पॉझिटीव्ह रक्त देण्यासाठी रक्त मॅच करताना ओ पॉझिटीव्ह ग्रुप मॅच झाला नाही. नेमका प्रकार वैद्यकीय अधिकाऱयांनाही कळेना. सर्व वैद्यकीय टीम आणि लॅब टेक्नीशियनच्या सल्लाने एक महत्वपूर्ण टेस्ट करण्याचे ठरवले. ही टेस्ट केल्यानंतर हा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड असल्याचे कळते. या ब्लड ग्रुपचे जगभरात जेमतेम 400 लोक असून यापैकी भारतात केवळ 179 लोक आहेत. रत्नागिरीत हे रक्त कसे उपलब्ध होणार हा यक्षप्रश्न सर्वांसमोरच होता. त्यातच या महिलेची प्रकृतीही नाजूक होती. मात्र या बाबतची पोस्ट सोशल मिडियावर टाकण्यात आली. एका कष्टकरी महिलेचा तिच्या बाळासह जीव वाचवण्यासाठी बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन या पोस्टद्वारे जिल्हा शल्य चिकित्सकांकडून करण्यात आले.

ही पोस्ट पाहून सांगलीतील विक्रम यादव नामक तरूण मदतीसाठी धावून आला. अन्य वाहनाची वाट पाहत न बसता त्याने चक्क दुचाकी घेवून रत्नागिरीचे सिव्हील हॉस्पिटल गाठले आणि अंजली हेळकर यांना दुर्मीळ रक्त उपलब्ध करून दिले. त्वरित ब्लड मिळाल्याने नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विक्रम यादव यांचा जिल्हा शासकीय रूग्णालयामार्फत विशेष सत्कारही करण्यात आला.

Related posts: