|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार-बैलगाडी अपघातात एक गंभीर जखमी

कार-बैलगाडी अपघातात एक गंभीर जखमी 

वार्ताहर/ लोकूर

भरधाव जाणाऱया बोलेरो कारने रस्त्याच्याकडेने जाणाऱया बैलगाडय़ांना जोराची धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास गावापासून पूर्वेला अर्धा किलोमीटर अंतरावरील समर्थ गार्डन धाब्यानजीक झाली. या घटनेत बैलगाडय़ांमधील सहाजण व एक बैल जखमी झाला आहे. आरोडय़प्पा शिवलिंग मठपती (वय 55, रा. कमतेनट्टी, ता. चिकोडी) असे गंभीर जखमीचे तर सरोव्वा शिवलिंग मठपती (वय 50), गुरुसिद्ध रामू संकेश्वरी (वय 55, रा. बाड, ता. हुक्केरी), तायव्वा गुरुसिद्ध संकेश्वरी (वय 50), निरंजन गुरुसिद्ध संकेश्वरी (वय 35), बाळासाब बवराज संकेश्वरी (वय 30) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत.

घटनेविषयी अधिक माहिती अशी, खिळेगाव (ता. अथणी) येथील बसवाण्णा यात्रा असल्याने बैलगाडीने भाविक देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी सकाळी दर्शन घेऊन भाविक परतीच्या मार्गाने येत होते. मंगसुळीतील खंडोबा देवालयात मुक्काम करून मंगळवारी पहाटे 4 वाजता ते सर्वजण गावी निघाले होते. दरम्यान, समर्थ गार्डन धाब्यानजीक येताच मागून भरधाव वेगाने येणाऱया बोलेरोने (क्र. एमएच 07 एबी 0749) बैलगाडय़ांना जोराची धडक दिली. यामध्ये एक बैलगाडी रस्त्याकडेला फेकली गेली व दुसरी बैलगाडी 80 ते 100 फूट फरफटत विरुद्ध बाजूस फेकली गेली. त्यामुळे बैलगाडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेत बैलही जखमी झाला आहे.

पहाटेच्या सुमारास अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने शेजाऱयांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बैलगाडीत अडकलेल्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. काही नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर बोलेरोचे पुढील चाक पंक्चर झाल्याने वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पलायन केले आहे.

या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. जखमी बैलाची अवस्था पाहून अनेकांचे मन भरून आले. कार चालकाच्या चुकीची शिक्षा अन्य लोकांना भोगावी लागल्याने संताप व्यक्त होत होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.