|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बापूजी इंटरनॅशनल स्कूलचे भवितव्य अंधारमय

बापूजी इंटरनॅशनल स्कूलचे भवितव्य अंधारमय 

प्रतिनिधी / संकेश्वर

संकेश्वर-हुक्केरी रस्त्यानजीक असणाऱया भव्य दिव्य अशा बापूजी इंटरनॅशनल स्कूलचे भवितव्य अंधारमय बनले आहे. तथापि, स्कूलचे मालक बापूजी हे सध्या फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूलला टाळे ठोकले जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकाराने परिसरातून चिंता व संताप व्यक्त होत आहे.

गेल्या सात वर्षापूर्वी हुक्केरी तालुक्याच्या शैक्षणिक विश्वात नव्याने आगमन केलेल्या बापूजी इंटरनॅशनलने इतर संस्थेचे धाबेच दणाणून सोडले होते. पहिल्याच वर्षी 1 लाख रुपये भरून स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण करू व त्यानंतर तुमचे 1 लाख परत करू अशा भंपक अमिषाने पहिल्याचवर्षी 1500 मुलांनी स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. आधुनिक सोयी, सुविधा, निवासासह बसने घरपोच अशा एकापेक्षा एक सुविधांची पर्वणी ठेवून स्कूलकडे तालुक्यातील पालकांना आकर्षित करून घेतले होते.

पण 2016 च्या शैक्षणिक वर्षात संस्थेचे मालक आर्थिक संकटात सापडल्याने संस्थेतील शिक्षकांसह कर्मचाऱयांचे वेतन भागविण्यासाठीही त्यांच्याकडे निधी नसल्याचे उघडकीस आले आहे. तथापि, मध्यंतरी कर्मचाऱयांनी स्कूलबंद आंदोलन छेडल्याने सुमारे 15 दिवस स्कूलचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शिक्षणाधिकारी गजानन मण्णिकेरी यांनी तातडीने स्कूलला भेट देऊन कर्मचाऱयांना दिलासा देत यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत स्कूल सुरळीत चालणार असून त्यानंतर स्कूल चालणार की टाळे पडणार हा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत

विद्यार्थी प्रवेशासंदर्भात केलेल्या करारानुसार दहावीनंतर 1 लाख रुपये परत करण्याचा स्कूलने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे स्कूलच्या विश्वासार्हतेला धोका पोहोचला आहे. आजही लाख रुपयांच्या मागणीसाठी पालकवर्ग स्कूलचे उंबरे झिजवताना दिसत आहे.

कर्जदारांचे धाबे दणाणले

स्कूलच्या उभारणीसाठी मालक बापूजी यांनी सावकारी, बँका यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात कर्जाऊ स्वरूपात पैसा उचलला आहे. सदर कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँका व सावकारी कर्ज देऊ केलेल्यांनी बापूजींची भेट घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी ते फोनच्या संपर्कात होते पण सध्या त्यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची चौकशी केली असता ते कुठे गेलेत माहिती नाही. याशिवाय ते घरीही येत नसल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिल्याने कर्ज दिलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

व्यवहार फिसकटले

 

 

आर्थिक कोंडीत सापडलेल्या बापूजींनी स्कूलचीच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर स्कूल खरेदी करण्यासाठी दोन संस्थाचालकांनी प्रयत्न केला. पण उभयतात चर्चा निष्फळ ठरल्याने स्कूलचे भवितव्य दिशाहीन होण्याच्या मार्गावर आहे. सध्या मालकही फरारी असल्याने व काही कर्ज दिलेल्यांनी बापूजींवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.