|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्रीरामचंद्रांच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात

श्रीरामचंद्रांच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात 

प्रतिनिधी/ बेळगाव

जय श्रीरामच्या जयघोषात आणि भक्तीपूर्ण वातावरणात मंगळवारी शोभायात्रा उत्साहात पार पडली. रामनवमीच्या निमित्ताने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. शांततेत आणि उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात सारा परिसर दणाणून गेला होता.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. श्रीराम मूर्तीची विधिवतपणे पूजा करून पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये श्रीरामाची आकर्षक मूर्ती अनेकांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारी ठरली. ढोल-ताशांच्या गजरात सुरू असणारी ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली.

डॉ. आंबेडकर उद्यानापासून मिरवणुकीला सुरुवात होवून चन्नम्मा चौकातून कॉलेज रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक येथे शोभायात्रेची सांगता झाली. दुपारी 2 वाजता सुरू होणारी शोभायात्रा 4 वाजता सुरू झाल्याने अनेक तरुण चौकाचौकांमध्ये ताटकळत उभे होते. शोभायात्रा उशिराने सुरू झाल्याने सांगताही उशिराने झाली. यावेळी मोठय़ा संख्येने रामभक्त उपस्थित होते. दरम्यान या शोभायात्रेमुळे वाहनांची कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

अन् अनर्थ टळला

शोभायात्रेसाठी प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती नेहरुनगर परिसरातून शोभायात्रेच्या मार्गावर आणण्यात येत होती. यावेळी मूर्तीच्या मागे लावण्यात आलेल्या बॅनरचा स्पर्श विद्युत तारांना झाला. या बॅनरच्या स्पर्शाने विद्युत तारा तुटून चुकीची घटना घडण्याची शक्मयता होती. मात्र सुदैवाने अनर्थ टळला.

कडक पोलीस बंदोबस्त

शोभायात्रेच्या परवानगीसाठी आयोजकांनी पोलीस आयुक्तांकडे अर्ज दिला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान आयोजकांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल करून परवानगी मिळविली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 2016 सालीही पोलिसांनी याला परवानगी नाकारली होती. तेंव्हा देखील याचिका दाखल करून परवानगी मिळविण्यात आली होती.