|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ढेकोळीवाडी येथे शासकीय इतमामात जवान राजकुमार पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

ढेकोळीवाडी येथे शासकीय इतमामात जवान राजकुमार पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार 

वार्ताहर/ तुडये

ढेकोळीवाडी (ता. चंदगड) येथील जवान राजकुमार मारुती पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बुधवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे… अमर रहे… राजकुमार अमर रहे…’ या घोषणेने ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. मंगळवारी सायंकाळी बेळगाव येथील अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या जंगी फलटणमध्ये 1999 मध्ये राजकुमार पाटील भरती झाले. 18 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी सैन्यदलातील आणखी चार वर्षे सेवा वाढवून घेतली होती. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील ग्रेसर येथील 17 मराठा आरआरमध्ये सेवा बजावत होते. 30 दिवसांच्या सुटीकरिता ते आले होते. जानेवारी महिन्यात ते हवालदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आणखी चार वर्षांची सेवा शिल्लक होती.

बेळगाव येथे अपघाती निधन झाल्याची माहिती ढेकोळीवाडीत समजताच संपूर्ण गाव दुःखसागरात बुडाला. महिलांनी रात्री रस्त्यांची झाडलोट करून रांगोळीने तर  गावाचे प्रवेशद्वार पताकांनी सजवले. बेळगाव मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या गाडय़ांच्या ताफ्यातून बुधवारी सकाळी मृतदेह ढेकोळीवाडी या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आला. मृतदेहावर फुलाचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या घरासमोर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. मेजर मधुकर भट, सुभेदार मोहन शास्त्राr, सुभेदार अशोक पाटील, हवालदार मेजर गणेश शिरसोदे यांच्या मराठा लाईट इन्फन्ट्रीचे 12 सेसीओ 100 जवानांनी मानवंदना दिली. प्रशासनाच्या वतीने चंदगडचे तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत यम्मेवार, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, सभापती जगन्नाथ हुलजी यांनी मानवंदना दिली. वडील मारुती पाटील यांनी मंत्राग्नी दिला. राजकुमार पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी छाया, नऊ वर्षांचा मुलगा आर्यन व सहा वर्षांचा अथर्व असा परिवार आहे.