|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तंबाखूला योग्य भाव हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली

तंबाखूला योग्य भाव हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली 

महेश शिंपुकडे / निपाणी

निपाणीसह परिसरातील शेतकऱयांचा आर्थिक कणा असणाऱया तंबाखूला चांगला भाव मिळाला पाहिजे. यासाठी 14 मार्च ते 6 एप्रिल 1981 अशा कार्यकाळात ऐतिहासिक तंबाखू आंदोलन छेडण्यात आले. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तत्कालीन गुंडूराव सरकारने पोलिसांकरवी गोळीबार केला. या बेछूट गोळीबारात 12 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आज याला 36 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही तंबाखू उत्पादक योग्य दराविना वंचित असून तंबाखू उत्पादक शेतकऱयांना योग्य भाव मिळणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.

निपाणीसह परिसरात पारंपरिक पद्धतीने तंबाखू उत्पादन घेतले जाते. या परिसरातील शेती व्यवसाय आजही तंबाखू उत्पादनामुळेच टिकून आहे. असे असले तरी शेतकऱयाला तंबाखूला योग्य भाव मिळविण्यासाठी 1981 मध्ये शेतकरी नेते शरद जोशी, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, गोपिनाथ धारिया यांच्यासह विविध शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडावे लागले. निपाणी परिसराची तंबाखू उत्पादनासाठी ओळख होतीच पण या ऐतिहासिक आंदोलनामुळे निपाणीची चळवळीचे शहर म्हणून संपूर्ण देशात ओळख निर्माण झाली.

ऐतिहासिक आंदोलनात तंबाखू कामगारांचा प्रश्नही मांडण्यात आला. 21 दिवस चालेलेल्या या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री गुंडूराव यांनी पोलिसांकरवी बेछूट गोळीबार केला. याचे वृत्त बीबीशीसह आकाशवाणीवरून प्रसारीत करण्यात आले. 7 एप्रिल 1981 रोजी लोकसभेत विरोधकांनी सभात्याग करून गोळीबार प्रश्नी चर्चेची मागणी केली. तंबाखू आंदोलनानंतर कर्नाटक सरकारने खरेदी-विक्री फेडरेशनची स्थापना केली. पण या फेडरेशनचा कोणताही लाभ. झाला नाही.

सद्यस्थिती पाहता निपाणी परिसरातील तंबाखू उत्पादन क्षेत्रात घट झाली असली तरी आजही तंबाखू उत्पादन क्षेत्र सर्वाधिक आहे. शासनाने सध्या तंबाखू विरोधी धोरण अवलंबल्याने उत्पादक शेतकऱयांना याचा फटका बसू लागला आहे. तंबाखूवर निर्बंध आणण्यासाठी शासनाने वेगवेगळ्य़ा पर्यायाने वाटचाल चालविली असली तरी उत्पादक शेतकऱयांना इतर पिकांचा कोणताही पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही.

गेल्या काही वर्षात तंबाखूला ऊस उत्पादन हा पर्याय स्विकारण्याचे प्रयत्न शेतकऱयांनी केले. पण उसाचे उत्पादन क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होवून ऊस दरातही घट झाली. यामुळे एकीकडे तंबाखूला दर मिळत नाही म्हणून ऊस उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना पुन्हा दर घटीची समस्या माथी घ्यावी लागली. दोन वर्षाच्या काळात पावसाविना ऊस उत्पादनात घट झाली आहे. पाण्याविना ऊस उत्पादन घेणेही अवघड झाले असून तंबाखू हाच पर्याय शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे.