|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खडेबाजार भागात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

खडेबाजार भागात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम 

प्रतिनिधी / बेळगाव

महानगरपालिकेतर्फे बुधवारी शहरातील अत्यंत गजबजलेल्या खडेबाजार व इतर ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सकाळी खडेबाजार येथील दुकानांसमोर ठेवण्यात आलेल्या जाहिरातींचे लहान-मोठे फलक अचानक मनपा कर्मचाऱयांनी गाडीत घालून घेऊन गेल्याने व्यापाऱयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गेल्याच महिन्यात पोलीस संरक्षणात महानगरपालिकेने जेसीबीने दुकानाचे झंप तसेच गटारीवरील बांधकामाचे अतिक्रमण हटविले होते. पण ही मोहीम अर्धवटपणे राबविण्यात आली.

पक्षपातीपणाचा आरोप

साधारण दीड-दोन महिने सदर मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी काही दुकानांच्या झंपना हात लावण्यात आले नव्हते. त्यावेळी येथील व्यापाऱयांनी पक्षपाताचा आरोप अधिकारी व पोलीस खात्यावर केला होता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा येथील व्यापाऱयांनी जैसे थे परिस्थिती ठेवली आहे.

बुधवारी पुन्हा मनपातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. दोन महिन्यापूर्वीच येथील व्यापाऱयांनी अतिक्रमण हटाव मोहिमेत हलगर्जीपणा करू नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. पण व्यापाऱयांच्या मागणीलाही वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. यामुळे व्यापाऱयांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

झंप लावण्यासाठी वेगळी शक्कल

खडेबाजार येथील व्यापाऱयांनी झंप लावण्यासाठी वेगळीच शक्कल लढविली आहे. काही व्यापाऱयांनी फायबर व प्लास्टीक रेक्झिनचे फोल्डींग लावले आहेत. ज्यावेळी अतिक्रमण हटाव मोहिमेचे कर्मचारी येतात त्यावेळी सदर झंप फोल्ड करतात. कर्मचारी पुढे गेले म्हणजे पुन्हा झंप पुढे आणतात. काही झंप तर अर्धा रस्ताच व्यापतात.

फेरीवाल्यांचा पुन्हा विळखा

खडेबाजार व इतर गजबजलेल्या भागामध्ये फेरीवाल्यांचा पुन्हा विळखा वाढू लागला आहे. सदर फेरीवाले कुणालाही जुमानत नाहीत. तसेच गटारीच्या बाहेर रस्त्यावरच दिवसभर ठाण मांडून आहेत. त्याच्यामुळेच वाहतुकीला व नागरिकांना चालत जाणेही मुश्कील झाले आहे.

गटारींची अर्धवट स्वच्छता

ज्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. त्या ठिकाणी गटारींची अर्धवट स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या कर्मचाऱयांनी गटारीवरील फरशा फोडल्या आहेत. तर काही ठिकाणी गटारीवरील फरशांना हातच लावला नाही. तसेच गटारींचे तोडलेले बांधकामही केले नाही. खडेबाजार येथील नामदेव मंदिराशेजारी 1993 पासून गटारीचे काम नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. वरील सर्व समस्या सोडवाव्यात आणि अतिक्रमण हटाव मोहीम अर्धवट राबवू नये, तसेच फेरीवाल्यांचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी येथील नागरिक व व्यापाऱयांनी केली आहे.