|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पर्ससीन बंदी मोडणाऱयांवर यापुढे कठोर कारवाई

पर्ससीन बंदी मोडणाऱयांवर यापुढे कठोर कारवाई 

प्रतिनिधी / रत्नागिरी :

पर्ससीननेटद्वारे बेकायदेशीर मच्छीमारी यापुढे बंद म्हणजे बंदच. ही बंदी मोडून मच्छीमारी सुरु राहिली तर नौका जप्त करण्यासह कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी दिला आहे. विविध मच्छीमार संघटनांच्या बैठकीवेळी त्यांनी कायद्याच्या कडक अंमलबजावणीच्या सूचना केल्या.

शासनाने 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीत पर्ससीन मासेमारीवर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी साहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासनाला दिल्या. पारंपरिक मच्छीमारांच्या मागणीनुसार विविध मच्छीमार संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

. या बैठकीला पारंपरीक मच्छीमारांचे खलील वस्ता, अबित तांडेल, ट्रॉलींग लाँच मालक संघाचे महेश आयरे, आप्पा वांदरकर, मिरकरवाडा मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी, पर्ससिननेट लाँच मालक संघाचे सुलेमान मुल्ला, मिनी पर्ससिन नेट संघटनेचे पदाधिकारी बंदर विभागाचे अधिकारी उगलमुगले, तटरक्षक दलाचे कमांडंट, पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, सहाय्य मत्स्यव्यवसाय आयुक्त एन.व्ही. भादुले आदी उपस्थित होते.

या बैठकीत पारंपरिक मच्छीमार तसेच ट्रॉलींग करणाऱया मच्छीमारांनी आक्षेप घेतला की, पर्ससीन नेट मच्छीमारीसाठी 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट दरम्यान बंदी आहे. असे असताना रत्नागिरी जिह्यात पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारी होते. एवढेच नव्हे तर पंचंड प्रकाशाचे दिवे लावून मासे मारले जातात. दोन्ही बाबी बेकायदेशीर आहेत. सुलेमान मुल्ला म्हणाले की, आमची मच्छीमारी 12 नॉटीकल मैलच्या पुढे आहे. ते राज्याच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्याबाबत कोणीही हस्तक्षेप करु नये. आम्हाला फार मासे मिळत नाहीत. आमचे पोट त्याच्यावर आहे. त्यामुळे पर्ससीन मच्छीमारी सुरु रहावी अशी मागणी केली.

जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. ते म्हणाले. कायद्याचे पालन सर्वांनाच करायला हवे. पर्ससीन मच्छीमारी 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. 12 नॉटीकल मैलच्या पुढे जाऊन या कालावधीत पर्ससीन धारकांना मच्छीमारी करता येईल. त्यासाठी केंद्र सरकारचा परवाना आणणे आवश्यक आहे. जोवर केंद्र सरकारचा परवाना येत नाही, तोवर कोणालाही तशी मच्छीमारी करु देता येणार नाही.