|Sunday, July 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दलाई लामांचे तावांग येथे भव्य स्वागत

दलाई लामांचे तावांग येथे भव्य स्वागत 

तावांगच्या बौद्ध स्तुपामध्ये लामांचे भव्य स्वागत : चिनी प्रसारमाध्यमांची लामांच्या दौऱयावर पुन्हा टीका : भारताकडून दलाई लामांच्या दौऱयाचे समर्थन

वृत्तसंस्था / तावांग

तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरू आणि स्वायत्त तिबेटी राष्ट्राचे पुरस्कर्ते दलाई लामा यांचे शुक्रवारी अरुणाचल प्रदेशमधील तावांग भागात आगमन झाले आहे. ते येथे पोहोचल्यानंतर त्यांचे स्थानिक नागरिक आणि मान्यवरांकडून भव्य स्वागत करण्यात आले. चीनने विरोध केल्यामुळे दलाई लामांची अरुणाचल प्रदेश भेट चांगलीच गाजत आहे.

पारंपरिक बौद्ध पोशाखात शेकडो विद्यार्थ्यांनी आणि बालकांनी दलाई लामांचे हात उंचावून अभिवादन केले. यावेळी त्यांनी हातात तिबेटचे धार्मिक ध्वज धरले होते. गेल्या 58 वर्षात दलाई लामा यांची अरुणाचल प्रदेशला ही पहिली भेट आहे. 58 वर्षांपूर्वी ते याच तावांगमधून चिनी लाल सेनेला चकवा देत भारतात प्रवेशले होते.

गोमडीला आणि गिरांग येथील बौद्ध स्तुपांना त्यांनी भेट दिली. गुरुवारी गिरांग येथे हजारो बौद्ध भिक्षुंच्या उपस्थितीत धर्ग्यालिंग प्रार्थनास्थळात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दलाई लामांनी या कार्यक्रमात उपस्थित बौद्ध भिक्षुंना मार्गदर्शन केले. कितीही अन्याय सहन करावा लागला तरी सत्याची कास न सोडण्याचे आणि विश्वशांतीसाठी सदैव प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी बौद्ध समाजाला केले. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अरुणाचल प्रदेश सरकारचे अनेक ज्ये÷ अधिकारी होते.

सकाळपासूनच जोरदार तयारी

लामा यांचे आगमन तावांगमध्ये होण्यापूर्वी शुक्रवारी सकाळपासूनच स्थानिक नागरिकांची त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू झाली होती. रस्ते व घरांची अंगणे स्वच्छ करण्यात आली होती. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा बौद्ध धर्माचे ध्वज लावण्यात आले होते. दलाई लामांचे असंख्य अनुयायी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. शेजारच्या भुतान देशामधूनही अनेक बौद्ध भिक्षु भिक्षुणी लामांच्या दर्शनासाठी सीमा ओलांडून तावांगमध्ये आले होते.

येथे आल्यानंतर त्वरित लामांनी तावांग स्तुपाला भेट दिली. येथे त्यांचे पारंपरिक बौद्ध पद्धतीनुसार भव्य स्वागत करण्यात आले. तावांगच्या हायस्कूल मैदानावर त्यांची संध्याकाळी भव्य सभा झाली. त्यात त्यांनी बौद्ध समाज तसेच बौद्ध भिक्षुंना विश्वशांतीसाठी कार्यरत राहण्याचा उपदेश केला.

चीनचा विरोध कायम

अरुणाचल प्रदेशाचा तावांग भाग हा दक्षिण तिबेटचा प्रदेश असल्याचे चीन मानतो. त्यामुळे या प्रदेशावर भारताचा अधिकार नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे दलाई लामा यांनी भेट देऊनही यासाठी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न चीनने चालविला होता. तथापि, त्याच्या नाकावर टिच्चून लामा यांनी तावांगमध्ये प्रवेश केला. तसेच कार्यक्रमही केला. याबद्दल चीनने भारताकडे निषेध नोंदविला असून द्विपक्षीय संबंध बिघडतील, अशी धमकी दिली आहे. शुक्रवारीही चिनी प्रसारमाध्यमांनी लामांच्या भेटीवर टीका केली.

Related posts: