|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पर्यटन महोत्सवात ‘शॉर्ट-फिल्म’ महोत्सव!

पर्यटन महोत्सवात ‘शॉर्ट-फिल्म’ महोत्सव! 

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱया पर्यटन महोत्सवात विविधांगी कार्यक्रमांची मोठी रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमांचा पर्यटकांना आस्वाद घेता यावा व त्या माध्यमातून येथील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूनेही पाऊल उचलण्यात आले आहे. येथील स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या दर्जेदार शार्टफिल्मचा या महोत्सवात अंतर्भाव करण्यात आला असून एकूण 5 शार्टफिल्म पाहण्याची पर्वणी पर्यटक व रसिकांना मिळणार असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले.

रत्नागिरीची महती पर्यटनाच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेण्यासाठी नगर परिषदेने यावर्षी मोलाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारीत नगर परिषद गुंतली असल्याचे नगराध्यक्ष पंडित यांनी सांगितले. या महोत्सवाचा पहिल्या टप्प्यात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात येणार आहे. येथील स्थानिक कलाकारांनी फिल्म जगतावर आपल्या कार्य कौशल्याची मुद्रा उमटवलेली आहे. त्यातील 5 दर्जेदार शार्टफिल्मचा समावेश आहे.

पर्यटन महोत्सवात दाखवण्यात येणाऱया शार्टफिल्मध्ये समर्थ रंगभूमी निर्मित ‘प्र.ल.’ हा लघुपट ज्येष्ठ नाटककार कै. प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या नाटय़विषयक कारकिर्दीवर आधारित आहे. हा लघुपट फक्त 47 मिनिटांचा आहे. लघुपटाच्या डिव्हीडीचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशन झाले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रानेही दखल घेतलेला हा लघुपट आहे.मुंबईतील व्यावसायिक कलाकार आणि रत्नागिरीतील तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन केलेला हा लघुपट आहे.

रमेश कीर कला अकादमीच्या ‘रापण’’ हा लघुपट कोकणातील मच्छिमारांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा आहे. कोकणातील मच्छिमारी, समुद्रकिनारा आणि किनाऱयावरील जीवनमानाचे दर्शन घडवणारा हा 18 मिनिटांचा लघुपट आहे. आशय सहस्त्रबुध्दे यांचा “द् अनअर्थड् होलो’ हा लघुपट रत्नागिरीतील भगवती किल्यावर असलेल्या भुयारावरील साहसी माहितीपट आहे. भुयाराची सफर घडवणारी ही फिल्म आहे. हा लघुपट 15 मिनिटांचा असून केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये सादरीकरण झालेला आहे.

तसेच ओंकार रसाळ यांचा ‘उडी’ हा लघुपट लहान मुलांच्या मनातील भीतीवर भाष्य करणारा आहे. संगमेश्वर आणि वेतोशी गावामध्ये त्यासाठी चित्रिकरण झालेले आहे. ग्रामीण कोकणातील जीवनमान दर्शवणारा हा 18 मिनिटांचा लघुपट आहे. त्याला आतापर्यंत 17 ऍवॉर्ड प्राप्त झालेली आहेत. माय मुंबई शार्टफिल्ममध्ये सर्वोत्तम दिग्दर्शन, संकलन आणि फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. डिसीएस फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्तम पटकथा आणि फिल्मचा पुरस्कार देखील मिळाला आहे. पुण्यातील हालत्या चित्रांच्या स्पर्धामध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक, फिल्म, संकलन आणि पटकथेचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.

आणखी एक लघुपट आदित्य सावंत यांचा ‘पत्र’ हा आहे. हा लघुपट पोस्टमनच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यामध्ये कोकणातील ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. खरवते गावात फिल्मचे शुटींग करण्यात आले आहे. 18 मिनिटांचा हा लघुपट आहे. मुंबई इंटरनॅशनल शार्टफिल्म फेस्टीव्हलमध्ये या लघुपटाला नामांकनही प्राप्त झालेले असल्याचे सांगण्यात येत आहे. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता येथील स्वा. वि.दा.सावरकर नाटय़गृह, रत्नागिरी येथे 2 तास 45 मिनिटांचा हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उपनराध्यक्ष राजेश सावंत हे देखील उपस्थित होते.