|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » डॉ. बाबासाहेबांची दुर्मीळ पुस्तके वाचकांच्या भेटीला

डॉ. बाबासाहेबांची दुर्मीळ पुस्तके वाचकांच्या भेटीला 

मुंबई विद्यापीठात महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब जयंती सप्ताह

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 14 एप्रिल 2017 दरम्यान या आयोजित केलेल्या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पंडित जवाहरलाल नेहरु ग्रंथालय येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पुस्तके,  छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात येईल. कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. मगरे यांचे 11 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर दुपारी 4 ते 7 वाजेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रवीण जोंधाडे ‘गाथा भीमाची’ सादर करणार आहेत.

दुसऱया दिवशी 11 एप्रिल रोजी महात्मा फुले वाडा (भिडे वाडा) पुणे आणि भिमा कोरेगाव विजयस्तंभ आणि चवदार तळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, दापोली आणि आंबडवे येथे विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी-कर्मचारी हे नियोजित ठिकाणी भेटी देऊन अभिवादन करतील.

12 एप्रिल रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची राज्यघटना’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये सुधाकर गायकवाड, बीरज मेहता, भूषण आरेकर, हर्षद भोसले, संदेश वाघ आणि दत्ता घुगे यांचा सहभाग असेल. संध्याकाळी 5 ते 8.30 वाजेच्या दरम्यान डॉ. संजय मोहोड आणि कलाकार औरंगाबाद यांचा ‘रंगला भूमिचा नवा सूर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

13 एप्रिल रोजी भारतीय घटनेच्या सरनाम्याचे वाचन केल्यानंतर सकाळी 10 ते 1 वाजेच्या दरम्यान विविध चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सायंकाळी 4 ते 6.30 वाजता ‘महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समकालीन भारतातील वाढती समर्पकता’ या विषयावर न्यायाधिस अंबादास जोशी, अध्यक्ष महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रब्युनल यांच्या एका विशेष व्याख्यानाचे दीक्षांत सभागफह येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे असतील तर डॉ. अनिल पाटील, अध्यक्ष शैक्षणिक नियोजन आणि विकास यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 14 एप्रिल सकाळी 9 वाजता फिरोजशहा मेहता भवन येथे या जयंती सप्ताहाचा समारोप होणार असून प्रा. गौतम गवळी हे जयंती सप्ताहाच्या अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.