|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भिवंडी परिसरात उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करणार

भिवंडी परिसरात उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करणार 

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वाहतूक कोंडी कमी करणाऱया माणकोली उड्डाणपुलाच्या

4 मार्गिका वाहतुकीस खुला

भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले असून या ठिकाणी अद्ययावत लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या सोयी सुविधा असतील. तसेच 10 लाख लोकांना रोजगारही मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी  भिवंडी माणकोली येथे सांगितले. ते माणकोली नाका येथील उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गीकेचे उद्घाटन करतांना बोलत होते. या उड्डाणपुलामुळे ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बऱयाच प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला बांधलेली फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. भिवंडी परिसराच्या सर्वांगीण कायापालटाचे नियोजन स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे जाहीर केले.

भिवंडीच्या विकासाचा आराखडा पूर्वीच्या सरकारच्या काळात तसाच पडून होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्याला जोरदार गती देऊन काही महिन्यातच बदल दिसू लागला. याठिकाणी 985 कोटींचे विविध विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागातील 60 गावांमध्ये देशातील एक उत्तम लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येईल. या ठिकाणी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी इतर आवश्यक पायाभूत सुविधा असतील. संपूर्ण देशाच्या लॉजिस्टिकचे भिवंडी हे मुख्य पेंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून गावठाणांचा आदर्शविकास करणे, ग्रामस्थांना उत्तम मोबदला देऊन त्यासाठीची जमीन घेणे या गोष्टी तातडीने सुरू करण्याचे निर्देशच त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांना दिले. यासाठी कुठल्याही प्रकारे निधी कामू पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले.

एकात्मिक आणि चक्राकार वाहतूक व्यवस्था

केवळ मुंबईच नव्हे तर मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आम्ही मेट्रोला प्राधान्य द्यावयाचे ठरविले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 10 वर्षात 10 किमी मेट्रोचे कामही झाले नव्हते ते आम्ही 2 वर्षांत प्रत्यक्ष 120 किमीचे काम सुरूही झाले आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी भागात 559 कोटींचे 5 उड्डाणपूल बनविण्यात येत आहेत. नजीकच्या काळात वंजारपट्टी, राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, ठाणे-भिवंडी, माणकोली-मोटा गाव अशा या वाहतूक प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळण सुरळीत होऊन वाहतूकही वेगवान होईल.

मेट्रोमुळे कसा फरक पडतोय हे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 2 कोटी मोठय़ा झाडांमुळे जितके कार्बन फूट प्रिंट कमी होतील तितके ते मेट्रोच्या मार्गांमुळे कमी होतील. त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशी ही वाहतूक प्रणाली एकात्मिकरीतीने विकसित करण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई-ठाणे-कल्याण-भिवंडी-भाईंदर अशी एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल, त्यामुळे एमएमआरमधली सगळी छोटी मोठी शहरे जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचे काम दिले आहे.

वर्सोवा पुलासाठीही बैठक घ्या : पालकमंत्री

प्रारंभी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील यांनी भाषणे केली. पालकमंत्री म्हणाले की, वर्सोवा पुलाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून राष्ट्रीय महामार्गासह सर्व संबंधिताना निर्देश द्यावेत म्हणजे काम वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. तळोजापर्यंत आलेली मेट्रो कल्याणपर्यत आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

खासदार कपिल पाटील म्हणाले की, या क्षेत्रातील 34 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणे गरजेचे आहे. अजूनही या ठिकाणी केवळ 8 एमएलडी पाणी पुरविले जाते. भिवंडी हे नवी मुंबईसारखे नियोजनबद्ध शहर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शांताराम मोरे, आ. किसान कथोरे, आ. महेश चौगुले, आ. गणपत गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, भिवंडी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

असा आहे हा उड्डाणपूल

शनिवारी उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाच्या 4 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. याची लांबी 650.33 मीटर इतकी असून उर्वरित 4 मार्गिकांचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल माणकोली नाक्यावर असून दुसरा पूल भिवंडी कल्याण जंक्शन येथे असेल. सुप्रीम इफ्रास्ट्रक्चरने याचे बांधकाम केले असून दोन्ही उड्डाणपुलाच्या खर्च सुमारे 121 कोटी इतका असेल. या मार्गिका खुल्या केल्यामुळे माणकोली नाका येथे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी दूर होईल. पुलाचे बांधकाम करतांना स्टेमच्या पाणी वाहून नेणाऱया पाईपलाईन्स, बीपीसीएलच्या लाईन्स तसेच आसपासची दुकाने व इतर बाबींमुळे पुलाचे काम मध्यंतरीच्या काळात रखडले होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related posts: