|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खानापूर तालुक्यात भाजपची विशेष मोहिम

खानापूर तालुक्यात भाजपची विशेष मोहिम 

प्रतिनिधी / आटपाडी

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आटपाडी तालुक्यात भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत पूर्ण बहुमत प्राप्त केल्यानंतर खानापूर तालुक्यात भाजपला ’अच्छे दिन’ आणण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे स्वत: खानापूर तालुक्यात पक्षवाढीसाठी विशेष मोहिम राबविणार असून त्याबाबत त्यांनी सुतोवाच करत आटपाडी पाठोपाठ खानापूर तालुक्यात भाजपचे संघटन मजबुत करणार असल्याची माहिती दिली.

भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि गत विधानसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यात आघाडी घेतली. विधानसभेच्या चौरंगी निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मतदारसंघात तिसऱया तर आटपाडी तालुक्यात पहिल्या क्रमांकाची मते घेतली. कधी नव्हे ते तालुक्यात भाजपचा झेंडा अनेक ग्रामपंचायती व सोसायटय़ांवर फडकविण्यात त्यांनी योगदान जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात या पक्षाची ताकद वाढली.

आटपाडी तालुक्यात शिवसेना आणि त्यांच्या नेते, समर्थकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्युहरचना आखुन त्यामध्ये यशस्वी होत राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांनी बाजी मारली. पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर भाजपने वर्चस्व मिळविले. सत्तेच्या माध्यमातून आटपाडी तालुका भाजपमय करून प्रमुख विरोधी शिवसेनेला बाजुला सारल्यानंतर मतदारसंघात साखरपेरणी करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात विशेष मोहिम राबवुन पक्षासाठी गोळाबेरीज सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

2014च्या खानापूर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण करून काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपला धक्का दिला. खानापूर तालुक्यात शिवसेना आघाडीवर असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सेनेचे वर्चस्व सिध्द केले. जिल्हय़ात सर्वत्र भाजपचा बोलबाला असलातरी भाजपला अद्यापही खानापूर तालुक्यात अपेक्षीत यशापर्यंत मजल मारता आलेली नाही. ही बाब पक्षासाठी चिंतेची आहे. त्यामुळे आता खानापूर तालुक्यात भाजपला विस्तारासाठी गोपीचंद पडळकर प्रयत्न करणार आहेत.

खानापूर तालुक्यात भाजपला आजपर्यंत अपेक्षीत यश आणि ताकद लाभलेली नाही. परंतू आता येणाऱया लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर मतदारसंघात काही राजकीय भुकंप घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी भाजपचा पाया मजबुत करून पक्ष संघटन वाढविण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी खानापूर तालुक्यात विशेष मोहिम राबविणार असून सर्वांना सोबत घेऊन नवीन कार्यकर्त्यांची मजबुत फळी निर्माण करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी ’तरूण भारत’शी बोलताना सांगितले.