|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावात आज निघणार शिमगोत्सवाची मिरवणूक

बेळगावात आज निघणार शिमगोत्सवाची मिरवणूक 

गोमंतभूमीच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्यदिव्य आविष्कार घडणार :

प्रतिनिधी / बेळगाव

गोमंतभूमीच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्यदिव्य आविष्कार घडविणारी शिमगोत्सवाची मिरवणूक रविवार दि. 9 रोजी बेळगाव शहरातून निघणार आहे. बेळगाव आणि गोव्याच्या सांस्कृतिक हितसंबंधांचा धागा अधिकच दृढ करणाऱया या मिरवणुकीच्या आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा चौकातून ही मिरवणूक निघणार आहे. समस्त नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन लोकमान्य परिवारातर्फे करण्यात आले आहे. या मिरवणुकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर उपस्थित राहणार आहेत.

   गोव्यात शिमगोत्सवाला आगळेवेगळे पावित्र्य आहे. हेच पावित्र्य बेळगावच्या शिमगोत्सवाला आणून देण्याचा निर्धार किरण ठाकुर यांनी केला आहे. या संदर्भातील जागृतीसाठी रविवारी बेळगावात शिमगोत्सवाची गोमंतकीय शोभायात्रा निघणार आहे. अतिशय वैशिष्टय़पूर्ण अशा या मिरवणुकीचा लाभ सर्व बेळगावकरांनी घ्यावा, असे आवाहन किरण ठाकुर यांनी केले आहे.

लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून किरण ठाकुर यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुरुवातीपासूनच भरीव काम केले आहे. बेळगावची शिवजयंती आणि गणेशोत्सव विधायक व्हावा हा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला चांगले यश आले आहे. पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव मिरवणूक काढता येते, हे त्यांनी अशाच एका मिरवणुकीतून दाखवून दिले होते. त्याचा सकारात्मक परिणाम पाहावयास मिळू लागला आहे. अशीच शिस्त आणि पावित्र्य शिमगोत्सवाला यावी हा उद्देश त्यांनी बाळगला आहे.

शिमगोत्सव बदलण्याच्या प्रक्रियेची पायाभरणी

रविवारी होणारी शोभायात्रा ही बेळगावचा शिमगोत्सव बदलण्याच्या प्रक्रियेची पायाभरणी असणार आहे. तब्बल 3 हजार गोमंतकीय कलाकार आपल्या वैशिष्टय़पूर्ण चित्ररथांसमवेत बेळगावात दाखल होणार आहेत. आपापल्या कलांचे बेळगावच्या रस्त्यावर दर्शन घडविणार आहेत. ही एक सुरुवात आहे. शिमगा किंवा होळी या सणाला गोव्यात मोठे महत्त्व आहे. तसे बेळगाव, गोवा आणि कोकण एकमेकापासून वेगळे नाहीत. यामुळेच ही गोमंतकीय परंपरा कोकण आणि गोव्यात रुजविण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे किरण ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.

नुकतीच सावंतवाडी येथे ही मिरवणूक आयोजित करून तेथील स्थानिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न ‘लोकमान्य’च्या माध्यमातून झाला आहे. या माध्यमातूनच पुढील वर्षीच्या शिमग्यात आकर्षक बक्षिसे जाहीर करून अनेक नवतरुणांना या सणाकडे वेगळय़ा पद्धतीने आकर्षित करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याला नक्कीच यश येईल, असा विश्वासही किरण ठाकुर यांनी व्यक्त केला आहे

सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीस प्रारंभ

हुतात्मा चौक येथे सायंकाळी 5 वाजता या मिरवणुकीचा प्रारंभ पूजन कार्यक्रमाने होणार आहे. तेथून किर्लोस्कर रोड मार्गाने जाऊन न्यूक्लिअस मॉलकडून रामलिंगखिंड गल्ली, सम्राट अशोक चौक, टिळक चौक या मार्गाने जाऊन हेमू कलानी चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणुकीत शिवजयंती  मंडळे तसेच गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमान्यने केले आहे.  

   हिंदू संस्कृतीची व्यापकता दिसेल

श्री हनुमान जयंतीचा उत्सव आता जवळ येऊन ठेपला आहे. विविध प्रकारचे सण आणि उत्सव यांची परंपरा जपण्याचे कार्य आपण सारे जण करतो. या संस्कृती परंपरेची वेगवेगळय़ा राज्यांमधील वेगवेगळी आचरण पद्धती सर्वांना समजावी, लोकसंस्कृती-परंपरेची देवाणघेवाण व्हावी यासाठी या शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन बेळगावात करण्यात येत आहे, असे मनोगत किरण ठाकुर यांनी व्यक्त केले आहे.