|Thursday, April 26, 2018
You are here: Home » मनोरंजन » षड्यंत्र पुन्हा रंगभूमीवर

षड्यंत्र पुन्हा रंगभूमीवर 

सुप्रसिद्ध नाटककार सुरेश जयराम यांचं 1990 साली गाजलेलं ‘षड्यंत्र’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. प्रकाश बुद्धीसागर दिग्दर्शित, अभिनेते चंदू पारखी, रमेश भाटकर, डॉ. गिरीश ओक, सविता प्रभूणे, प्रमोदीनी कदम, सुजाता कानगो, संदीप मेहता अभिनीत या नाटकाने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. जवळजवळ 27 वर्षांनंतर हे नाटक पुन्हा त्याच जोमात व जोशात आताच्या दिग्गज दिग्दर्शक व कलावंतांसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. अनिषा क्रिएशन्स निर्मित व मल्हार प्रकाशित, निर्माते मिलिंद मोरे आणि अभिनेता सुचित जाधव ‘षड्यंत्र’ या रहस्यमय, थरारक नाटकाची निर्मिती करीत आहेत. अभिनेता-दिग्दर्शक अरुण नलावडे या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून अभिनेत्री सिया पाटील, सुचित जाधव, सुदेश म्हशीलकर आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू असून शुभारंभाचा प्रयोग 21 एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे होणाऱया 97 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनामध्ये होणार आहे. षड्यंत्र हे नाटक एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात मिळकतीसाठी होणारा संघर्ष व त्यातून होणारे खून, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अशा गुंतागुंतीच्या कथानकावर आधारित आहे. या नाटकात अनेक धक्के आणि वळणे आहेत. त्यातून शिकार कोण आणि शिकारी कोण या संभ्रमात पडलेल्या प्रेक्षकांना खऱया अर्थाने एक रहस्यमय कलाकृती पाहिल्याचे समाधान देणारे नाटक आहे. गेली अनेक वर्ष आपल्या वेगवेगळय़ा भूमिकेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य करणारे अष्टपैलू अभिनेते अरुण नलावडे बऱयाच कालावधीनंतर पुन्हा एकदा या नाटकाद्वारे नाटय़ दिग्दर्शन क्षेत्रात उतरले आहेत. अभिनेता सुचित जाधव या नाटकाद्वारे निर्मिती क्षेत्रात उतरले असून या नाटकात ते अभिनयही करणार आहेत. याआधी त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकातून तसेच अनेक मालिका व चित्रपटातून आपली छाप पाडली आहे. निर्माते मिलिंद मोरे प्रथमच या नाटकाद्वारे निर्मिती क्षेत्रात उतरले असून सुचित जाधव यांच्यासोबत ही भव्य निर्मिती करीत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. अनेक मालिका आणि नाटकातून लेखन, अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे सुदेश म्हशीलकर यांची या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. लोकप्रिय अभिनेते रमेश भाटकर या नाटकात एका वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहेत. योगायोग म्हणजे याआधीच्या ‘षड्यंत्र’ नाटकात त्यांनी तीच भूमिका केली होती.

27 वर्षांनंतर पुन्हा त्याच नाटकात तीच भूमिका करण्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. सोबत ऋषीकेश दळी, केवलानंद बर्वे, वासंतिका वाळके, प्रगती घाणेकर, माधुरी जोशी, देवेंद्र वाघमारे यांच्याही यात भूमिका आहेत. या नाटकाचे नेपथ्य प्रकाश मयेकर, संगीत प्रबोध शेटये, वेशभूषा पूर्णिमा ओक, प्रकाश योजना राजन ताम्हणे यांची असून सूत्रधार संतोष शिदम आहे. दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शन या जोरावर एक काळ गाजवलेले हे रहस्यमय नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येत आहे.

Related posts: