|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मजगाव गाडे यात्रा डॉल्बी मुक्त करण्याचा निर्णय

मजगाव गाडे यात्रा डॉल्बी मुक्त करण्याचा निर्णय 

वार्ताहर / मजगाव

मजगाव येथील गाडे यात्रा डॉल्बी मुक्त साजरी करण्याचा निर्णय येथील युवक मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. सदर यात्रा 12, 13 व 14 रोजी होणार आहे.

रविवारी श्री ब्रम्हलिंग देवस्थानमध्ये उद्यमबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन. एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बी. डी. कुडची अध्यक्षस्थानी होते.

यावेळी देवस्थान कमिटीचे सदस्य शिवाजी पट्टण, अनंत धुळाई, सुरेंद्र गौरण्णा, माणिक पाटील, सुरेश मजुकर, सिद्राय तळवार, राजू कोलकार, आपैय्या काकतकर, प्रकाश देसाई, कुबेर सोरटूर जयपाल बस्तवाड, मल्लाप्पा मजुकर, पोलीस पाटील, मल्लाप्पा मासोकर, राजू सातेरी आदी ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक म्हणाले की, मजगावचा इतिहास आजपर्यंत अबाधित आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. ते गुण्या गोविंदाने राहतात. आजपर्यंत कोणताही गोंधळ गावात झाला नाही. याची नोंद आहे. त्याबद्दल मला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. हल्ली काही युवक गावात उत्सवानिमित्त डॉल्बी लावून गोधळ घालत असल्याने तरुणावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यावेळी आळा बसणे आवश्यक आहे. विधायक कामासाठी पोलीस खात्याकडून नेहमी सहकार्य मिळेल. पारंपारिक वाद्ये यात्रेत जरूर वाजवा आनंद लुटा असे आवाहन करून त्यांनी 5000 रुपयांची देणगी जाहीर केली.तसेच यावर्षीच्या एसएसएलसी परीक्षेत मराठी विषयात प्रथम येणाऱया विद्यार्थ्यांला 5000 रुपयांचे बक्षिस ही जारी केले.

निवृत्त प्राध्यापक आपैय्या काकतकर यांनी यावेळी 25 हजार रुपयांची सोलार विद्युत पुरवठा यंत्र श्री ब्रम्हदेव मंदिराला सुपूर्द केली. त्याचे उद्घाटनही सीपीआय एन. एम. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी देणगीदार ए. डी. काकतकरांचा सत्कार देवस्थान कमिटीतर्फे अनंत धुळाई यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी मजगाव व परिसरातील सर्व युवक मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवाजी पट्टण, अनंत धुळाई, बी. डी. कुडची आदींची भाषणे झाली. यावेळी यात्रोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन शिवाजी पट्टण यांनी केल. आभार बी. डी. कुडची यांनी मानले.