|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘किल्ले सिंधुदुर्ग स्वाभिमानी इतिहासाची 351 वर्षे

‘किल्ले सिंधुदुर्ग स्वाभिमानी इतिहासाची 351 वर्षे 

मालवण350 वर्षांपूर्वी 25 नोव्हेंबर 1664 (शके 1586) या मंगलदिनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणातल्या वायरी-दांडी भागात सिंधुसागराच्या साक्षीने गणेशाला साकडं घातलं होतं. महाराजांनीसुद्धा ‘चौऱयांशी बंदरे ऐसा जागा नाही,’ असं म्हणत त्यावर शिक्कामोर्तब केलं. भूमिपूजनानंतर अवघ्या तीन वर्षांनी म्हणजे 1667 च्या हनुमान जयंती दिनी किल्ल्याचा वास्तुशांती समारंभ झाला. 11 एप्रिल 2017 रोजी किल्ले सिंधुदुर्ग आपला 351 वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्त…

  केंद्रीय पुरातत्व खाते, महाराष्ट्र शासन, किल्ला रहिवासी संघ, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, ग्रामपंचायत वायरी-भूतनाथ आणि लोकप्रतिनिधींकडून किल्ले सिंधुदुर्गचे गतवैभव पुन्हा निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. अजस्त्र लाटांच्या माऱयापुढे गेली 350 वर्षे सिंधुदुर्गची शान बनून उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील तटबंदीचे काम पूर्ण होत असल्याने पर्यटकांना पूर्ण किल्ल्यावरील तटबंदीवरून बिनधास्तपणे फिरता येणे शक्य होणार आहे. पेंद्र सरकारने या किल्ल्याला 21 जून 2010 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. गतवर्षी राज्य शासनातर्फे 350 वा वर्धापन दिन सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला होता.

 मालवणचा बोलबाला सातासमुद्रापार

   सिंधुदुर्गचे काम जसजसे पुढे जात होते, तसतसा मालवणचा व्यापार वाढू लागला होता. मोरयाच्या धोंडय़ाने मालवणचा कायापालट केला. कोकणी माणसाला नवचैतन्य दिलं. त्याने मरगळ झटकली, नैराश्याची कात टाकली. तो नव्या उमदीने कामाला लागला. स्थानिक मच्छीमार स्वखुशीने स्वराज्याच्या कामात सामील झाला. सिंधुदुर्गच्या उभारणीत मिळेल, ते काम स्वखुशीने करू लागला. ‘सिंधदुर्ग’ झपाटय़ाने पूर्णत्वाकडे जात होता. कामाचा झपाटा प्रचंड होता. अगदी महाराज आग्य्राला कैदेत असतानासुद्धा कामात तसूभरही खंड पडला नाही. तीन वर्षांच्या अखंड, अविरत श्रमाचं चीज झालं. महाराजांच्या कल्पनेतला ‘सिंधुदुर्ग’ साकार झाला. पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशहा, सिद्धी आणि वाडीकर, सावंत सगळय़ांनीच सिंधुदुर्गचा धसका घेतला. ‘सिंधुदुर्ग’ आता महाराजांच्या आरमारातील प्रमुख ठाणं झालं होतं आणि मालवण एक सुरक्षित बाजारपेठ. मालवणी माणसाला आता मालवणी असल्याचा अभिमान वाटू लागला होता. लेचापेचा कोकणी आता दर्यावर्दी आरमारी झाला होता. आपल्या सागरी हद्दी पार करून गोऱयांच्या आरमारी जहाजांवर थेट हल्लाबोल करीत होता. मालवणचा बोलबाला सातासमुद्रापार होत होता.

मालवणी स्वाभिमानाचे प्रतीक – गुरुनाथ राणे

 सिंधुदुर्ग आणि मोरयाचा धोंडा 350 वर्षे सिंधुसागराच्या माऱयात मोठय़ा दिमाखात एखाद्या स्थितप्रज्ञासारखे उभे आहेत. ही दोन्ही केवळ ऐतिहासिके स्थळे नाहीत, तर आमच्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आणि मालवणी स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाचं, धैर्याचं, जिद्दीचं, चिकाटीचं प्रतीक आहे. नवनवीन आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य देणारं प्रेरणास्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याच्या चरणी लीन होऊन हजारो संकटांशी सामना करण्यासाठी सहस्त्र हत्तीचं बळ मिळण्याचं ऊर्जास्त्राsत म्हणजे सिंधुदुर्ग. आपला देदीप्यमान इतिहास पुढच्या पिढीला सुपूर्द करण्याची वेळ आली आहे, असे किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे व सचिव विजय केनवडेकर यांनी सांगितले.

      छत्रपतींचे किल्ले स्फूर्तिदायक – आमदार वैभव नाईक

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यायची असेल, तर किल्ल्यांची अवस्था चांगली ठेवली पाहिजे. किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहासाची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचविता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. याप्रश्नी आपण विधानसभेतही आवाज उठविला आहे. राज्यात लहान-मोठे 317 किल्ले आहेत. यापैकी 40 पेक्षा अधिक किल्ले सिंधुदुर्ग जिल्हय़ात आहेत. जिल्हय़ात 800 वर्षे जुना असलेला विजयदुर्ग हा ऐतिहासिक किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला पुढील वर्षी 351 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग हे दोन्ही किल्ले पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहेत. किल्ले सिंधुदुर्गला गेल्या तीन वर्षांत सरासरी 2 लाख 69 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. दोन्ही किल्ल्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून ती दूर करण्याची गरज आहे. महाराजांच्या अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळत चालली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जगभरातील एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, असेही नाईक म्हणाले.

          मोरयाचा धोंडाला रासायनिक संरक्षण द्यावे – आनंद हुले

 हिंदुस्थानच्या आरमारी पाऊलखुणा जपणाऱया ऐतिहासिक ‘मोरयाचा धोंडा’ या देवस्थानची झीज होत आहे. हे देवस्थान गेली 350 वर्षे ऊन, पाऊस, समुद्राचे खारे पाणी, वादळ यांचा सामना करीत आजतागायत दिमाखात उभे आहे. या ऐतिहासिक वास्तूची झीज होत असल्याने रासायनिक संरक्षण (केमिकल कन्झर्व्हेशन) देण्याची मागणी शिवप्रेमी आनंद अतुल हुले यांनी पुरातत्व संचालनालयाकडे केली आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मूर्तीला अशाप्रकारे रासायनिक केमिकल देऊन मूर्तीचे संवर्धन करण्याच्या निर्णयावर तोडगा काढण्यात आला आहे. येथील दांडी किनाऱयावर इतिहासाची साक्ष देत, अजस्त्र लाटांचा मारा झेलत दिमाखात उभे असलेले ‘मोरयाचा धोंडा’ हे देवस्थान आहे. हे देवस्थान खडकात असून खडकावर गणेश, शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि नंदीची शिल्पे कोरली आहेत. महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पायाभरणी कार्यक्रम मोरयाचा धोंडा येथूनच केला होता. आज 350 वर्षे झाली, तरी हे ऐतिहासिकस्थळ दुर्लक्षित राहिल्याने झीज होत आहे. याचे जतन व संवर्धन होण्यासाठी रासायनिक संरक्षण करून वास्तूचे संवर्धन व्हावे, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. याबाबत आनंद हुले यांनी पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.