|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चार दहशतवाद्यांचा कुपवाडामध्ये खात्मा

चार दहशतवाद्यांचा कुपवाडामध्ये खात्मा 

वृत्तसंस्था/ श्रीनगर

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हय़ातील केरन सेक्टरमध्ये लष्कराने चार घुसखोर दहशतवाद्यांना ठार मारले, असल्याची माहिती सेनादलाच्या प्रवक्त्याने दिली. या परिसरामध्ये सध्या शोध मोहिम राबवण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषेनजिक केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत होता. याबाबतची माहिती मिळताच परिसरामध्ये मोठी नाकाबंदी करण्यात आली. घुसखोरांचा प्रयत्न सेनादलाने हाणून पाडला आहे. घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यावर त्यांनी सेनादलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये चार घुसखोर दहशतवादी ठार झाले. तरीदेखील या परिसरामध्ये शोध अभियान सुरूच ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, रविवारी रात्रीही काही दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्हय़ात एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला. परंतु जवानांनी केलेल्या जबाबी कारवाईनंतर ते लोक पळून गेले. या भागातील अनंतनाग लोकसभा मतदारसंघात बुधवार 12 रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी तसेच मतदारांना सुरक्षा देण्यासाठी अधिक प्रमाणात जवान तैनात केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवेळी उसळलेल्या हिंसाचार रोखण्यासाठी सेनादलाने केलेल्या गोळीबारामध्ये 8 जण ठार झाले. मतदानावेळी हिंसक जमावाने सेनादल तसेच मतदारांना लक्ष्य करत मोठय़ा प्रमाणात दगडफेक केली. त्याना रोखण्यासाठीच सेनादलाला अखेर गोळीबार करावा लागला होता. परंतु फुटीरतावादी नेत्यांनी याचा गैरफायदा घेत दोन दिवस बंदचे आवाहन केले आहे. हिंसाचारामुळे या भागात केवळ 7 टक्केच मतदान होऊ शकले. बडगाम जिल्हय़ात सर्वाधिक हिंसक घटना घडून सुमारे 5 जण मारले गेल्याचेही सांगण्यात आले.