|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ओह माय गॉड!

ओह माय गॉड! 

राज्यघटनेनुसार, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. इथे प्रत्येकाला आपल्याला पटेल त्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. ज्याला कोणताही विशिष्ट धर्म आपला नाही, असं वाटतं, त्याला तसं सांगण्याचा अधिकार आहे. तसंच नास्तिकतेचा पुरस्कार कुणाला करायचा झाला, तर तसं तो करू शकतो. देशाच्या घटनेने हे सारे अधिकार दिले असतानाही, देव आणि धर्म यांच्या नावाने स्वतःचे हट्टाग्रह जोपासणारे आणि त्याविरुद्ध भूमिका घेणाऱयांना प्रत्यक्षात संपवणारेही याच देशात आढळतात. दुर्दैवाने अलीकडे अशांची संख्या वाढत चालली आहे. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्यासारख्या बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांच्या पाठोपाठ आता कोईमत्तूर इथल्या एच. फरूक या स्वतःला नास्तिक म्हणवणाऱया तरुणाची हत्या झाल्याची घटना गेल्याच महिन्यात घडली. फरूक हा काही फार मोठा विचारवंत नव्हता. कोईमत्तूरमध्ये भंगारच्या व्यवसायात असणारा हा तरुण स्वतःची मतं मात्र आग्रहाने जोपासणारा होता. आपल्या फेसबुक पेजवर तसंच तो चालवत असलेल्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर तो बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारा मजकूर टाकत असे. आपण नास्तिक आहोत, असंही त्याने जाहीर केलं होतं आणि आपल्या धर्मावरही तो काही मुद्यांबाबत टीका करत असे. त्यांच्या धर्मातील काहीजणांना त्याची ही भूमिका पसंत नव्हती. त्यातूनच त्याला एकाकी गाठून चौघाजणांनी त्याचा खून केला. त्यापैकी काहींना अटकही झाली आहे. पण ही घटना मन सुन्न करणारी आहे….

फरूकच्या हत्येत त्याच्याच एका मित्राचा व आधीच्या व्यावसायिक भागीदाराचाही सहभाग होता, असं निष्पन्न झालं आहे. त्याचा मुनाफ हा मित्र फरूक लिहित असलेला मजकूर मूलतत्त्ववादी मुस्लीमांपर्यंत मुद्दामच पोहोचवत होता. त्याच्या हत्येची बातमी कळताच, हे दोघे हत्यारे मित्र घटनास्थळी आले होते. फरूकच्या कुटुंबीयांसोबत एक दिवस राहिलेही होते. त्यांच्या खुनातील सहभागाबद्दल कळताच, फरूकच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला. गेल्या काही वर्षांपासून फरूक पेरियार यांच्या विचारांनी प्रभावित झाला होता. देव व धर्माबाबत विशिष्ट भूमिका घेत होता. ‘द्रविडार विदुथलै कळघम’ या नास्तिकतावादी संघटनेचा तो सदस्य होता. या संघटनेने आयोजित केलेल्या निदर्शनांमधूनही तो सहभागी होत असे. त्याच्या घरातील इतरजण मात्र पारंपरिकरित्या मुस्लीम धर्माचं पालन करत होते आणि फरूकने कधी त्यांच्यावर नास्तिक व्हा, असा दबावही टाकला नाही. पण त्याचं ‘धर्मभ्रष्ट’ वर्तन इतरांना सहन न झाल्याने त्याची हत्या करण्यात आली. या कडवेपणाचा निषेध म्हणून, फरूकच्या वडिलांनी आता आपणही यापुढे नास्तिक म्हणूनच जगणार, असं जाहीर केलं आहे. एकप्रकारे त्यांनी फरूकच्या हत्येचा संबंध केवळ देवाधर्माशी वा धर्मस्वातंत्र्याशी नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी आहे, अशीच भूमिका घेतली आहे.

वरवर ही मुस्लीम धर्माशी संबंधित घटना वाटली, तरी तशी ती नाही. हा मुद्दा विशिष्ट धर्माशी निगडित नाहीच मुळी. प्रत्येक व्यक्तीला आपली अशी ओळख निर्माण करण्याचा आणि व्यक्तिमत्त्व अधोरेखित करण्याचा अधिकार आहे. या वाटेवर मग शिक्षण, राजकीय विचार, काम करण्याचा हक्क, भाषा वापरण्याचा अधिकार अशा अनेक गोष्टींबरोबर धर्माचाही समावेश होतो. धर्म मानणं वा न मानणं, आस्तिक, नास्तिक वा अज्ञेयवादी असणं, कधी विचार पक्का नसल्याने, प्रसंगी एखाद्याने गेंधळलेलं असणं हेही यात मोडतं.

पण या देशात विशेषतः धर्माचं राजकारण चालत असल्याने, व्यक्तीच्या धार्मिक ओळखीबाबत नको तितकं भान लोक बाळगताना दिसतात. नास्तिक व अज्ञेयवादी लोकांबद्दल प्रत्येकच धर्मातील सनातनी मंडळींना एक भय वाटत असतं. धर्मस्वातंत्र्याचा मुद्दाही अशावेळी वादग्रस्त बनू शकतो. 2014 साली मुंबई उच्च न्यायालयाने, कार्यालयीन कागदपत्रांवर आपला धर्म नोंदण्याची सक्ती सरकार कोणालाही करू शकत नाही, असा एक निर्णय दिला होता. तसंच, नागरिकाला आपण कोणत्याही धर्माचे नाही, असं म्हणण्याचा अधिकार आहे, असंही त्यात म्हटलं होतं. खरं तर भारतासारखा देशात नास्तिकतेची मोठी परंपरा शतकांपासून आहे. नास्तिकता विचार मांडणाऱयांनाही या देशात महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. एकेश्वरवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद अशा अनेक तत्त्वांनी इथे आपली मुळं रुजवली. बौद्ध व जैन धर्मासारखे प्रस्थापित धार्मिक विचारांशी फटकून राहणारे ‘पाखंडी’ धर्मही इथे तेवढेच फोफावले. चार्वाक, आजीविक या विचारधारा हिंदू धर्मात राहिल्या. नास्तिकतेच्याही अनेक विधा इथल्या तत्त्वज्ञांनी व विचारवंतांनी मांडल्या. आधुनिक युगात सामाजिक सुधारणांचा विचार करताना पुन्हा धर्माचरण व धार्मिक बंधनांची नव्याने चर्चा झालीच, जी आजही अनेक मुद्यांबाबत सुरूच असते. एकूणच, देव व धर्म याबाबत एकच एक दृष्टी न ठेवता, वेगवेगळय़ा भूमिका मांडण्याची परंपरा या देशाने अनुभवली आहे. परस्परांचा सन्मान ठेवत या विचारधारा आपल्या मार्गाने जात राहिल्या आहेत…

निधर्मी भारतात धर्म न मानण्यावरून एक दुर्दैवी हत्या घडली असताना, कट्टर इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानात एक वेगळीच घटना घडली. तिथल्या फिशेल बेनखैद नावाच्या एका तरुणाला त्याच्या निवडीनुसार कागदपत्रांवर ज्यू धर्म लावण्याची परवानगी पाकने दिली. एरवी इतरत्र असं करता येणं हे शक्मय असलं, तरी पाकमध्ये ते धर्मबाहय़ ठरलं असतं व या तरुणाला देहान्ताची शिक्षाही होऊ शकली असती. या तरुणाचे वडील मुस्लीम व आई ज्यू होती. कागदपत्रांवर त्याचा धर्म वडिलांचा, म्हणजे मुस्लीम लावण्यात आला होता. त्याचं नावही फैसल असं लावलं होतं. पण त्याने अलीकडे आपली धर्मविषयक नोंद बदलून त्यात ज्यू अशी सुधारणा करावी, असा अर्ज केला होता. त्याला त्याच्या मनाप्रमाणे बदल करून मिळाला. आधुनिक जगात विवेक बुद्धी आणि बुद्धिमत्ता यांना अधिक महत्त्व आहे. (याचा अर्थ संवेदनांना कमी लेखलं जाणं नव्हे.) तसंच सहिष्णुतेचं जगण्यातलं स्थानही मान्य होण्याची गरज आहे. माणूस आज भौगोलिक सीमांच्या पल्याड गेला आहे. पण जगाचा नागरिक बनताना, सहिष्णुता अत्यंत आवश्यक ठरते. तिच्या अभावी धर्म व संस्कृतीच्या संदर्भात कसे पेच निर्माण होतात, ते आपण पाहतच आहोत.. कोणीही असो, मग तो नास्तिक का असेना, त्याला याप्रकारे क्रूरपणे ठार करणं हा घोर अन्याय व अपराध आहे. खरंतर कथित ‘ऑनर किलिंग’, जात व खाप पंचायतींचे दबाव किंवा जात वा वर्णावरून माणसाला कमी लेखणं हे सारं एकाच तऱहेचं क्रौर्य आहे. धर्म ही माणसाच्या अनेक जाणिवा व ओळखींपैकी एक असते. ती जन्माने मिळत असली, तरी तिचा त्याग करण्याचा वा ती बदलण्याचा अधिकार माणसाला असतो. तसं पाहिलं तर, धार्मिकता, आस्तिकता-नास्तिकता, अज्ञेयवाद, आध्यात्मिकता, या एकमेकींपासून भिन्न अशा बाबी आहेत. देव न मानणारे, पण धर्माचरण करणारे असतात आणि देव मानणारे, पण धर्मकृत्य न करणारेही असतात. काहीजण वृत्तीने आध्यात्मिक असतात. पण त्यांचा देवाधर्मावर विश्वास नसतो. देव नाकारणारे धर्मही या जगात आहेत. माणूस माणसाशी कसा वागतो, दुसऱयाला तो त्रास देतो का, विनाकारण दुखावतो का, तो भ्रष्टाचार करतो का, हिंसकपणे वागतो का याला अधिक महत्त्व दिलं जायला हवं. त्यावरूनच माणसाची ओळख ठरायला हवी. धर्माच्या नावावरून वा आस्तिक-नास्तिक असण्यावरून नव्हे.

Related posts: