|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » डेव्हिस प्ले-ऑफमध्ये भारताचा मुकाबला कॅनडाशी

डेव्हिस प्ले-ऑफमध्ये भारताचा मुकाबला कॅनडाशी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डेव्हिस चषक स्पर्धेच्या प्ले-ऑफ लढतींचा ड्रॉ जाहीर झाला असून यानुसार भारताची प्ले-ऑफ लढत कॅनडाविरुद्ध होणार आहे. दि. 15 ते 17 सप्टेंबर या कालावधीत ही लढत होईल. डेव्हिस चषकाच्या अधिकृत ट्वीटर पेजवर पुढील लढतींची रुपरेषा जाहीर केली गेली आहे. भारताने मागील आठवडय़ात उझ्बेकिस्तानचा 4-1 असा पराभव करत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. न खेळणारा कर्णधार महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली भारताचा डेव्हिस चषकात हा पहिलाच विजय ठरला. अर्थात, दिग्गज, अनुभवी टेनिसपटू लियांडर पेसच्या गैरहजेरीतही भारताने उझ्बेकला सहज हरवले, ते लक्षवेधी ठरले. लियांडर पेसला उपलब्ध असतानाही फॉर्मच्या कारणावरुन वगळले जाण्याची ही मागील दोन दशकातील पहिलीच वेळ ठरली आहे. लियांडर पेस 1990 पासून सातत्याने डेव्हिस चषकात भारताकडून खेळत आला. यंदा मात्र ही परंपरा खंडित झाली. महेश भूपतीने यंदा पेसला मुख्य संघातून वगळण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. दुसरीकडे, कॅनडा संघाला फेब्रुवारीत विश्व गटातील पहिल्या फेरीत ग्रेट ब्रिटनविरुद्ध 2-3 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना पुन्हा प्ले-ऑफमध्ये खेळावे लागेल, हे स्पष्ट झाले.