|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंसह 10 जणांचा जामीन फेटाळला

उदयनराजेंसह 10 जणांचा जामीन फेटाळला 

खासदार उदयनराजेंना केव्हांही अटक होण्याची शक्यता ; उच्च न्यायालयात दाद मागणार- बनकर

 

प्रतिनिधी / सातारा

लोणंद येथील सोना ऍलाइंन्स कंपनीचे मालक रवींद्रकुमार जैन यांना खंडणीसाठी मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खा. उदयनराजे भोसलेसह 10 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आले आहे. तर खा. उदयनराजे भोसले यांनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने खा. उदयनराजे भोसलेसह अन्य 10 जणांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे खा. उदयनराजे भोसले यांना आता केव्हांही अटक होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालयाने जामिन अर्ज नामंजुर केल्याने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ऍड. दत्ता बनकर यांनी सांगितले.

उदयनराजे भोसलेसह 10 जणांच्या जामीन अर्जावर येथील जिल्हा न्यायाधिश शिरशीकर यांच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. यापुर्वीच सरकार पक्षाचा व आरोपीतील ऍड. डी. व्ही. पाटील यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मंगळवारी सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मुके व ऍड. महेश कुलकर्णी यांनी आरोपींना जामीन देवू नये असा पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर केला. यामध्ये अद्याप तपास अर्धवट आहे. तो पूर्ण झालेला नाही. तसेच फिर्यादीने सक्षम पुरावे सादर केलेले आहेत. पोलिसांनी फिर्यादीची मेडिकलची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच गेल्या 12 महिन्यात आरोपींना प्रती महिना 2 लाख रुपये अशी जी एकुण 24 लाख रुपये खंडणी गोळा केली आहे त्याची वसुली अद्याप झालेली नाही. तसेच फिर्याद हा घटनेच्या दिवशी तीथेच हजर होता हे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी अजिंक्य मोहिते व अन्य आरोपी फरार आहेत. त्यामुळे या आरोपींचा जामीन अर्ज नामंजुर करण्यात यावा असे सांगितले.

न्यायमूर्ती शिरशीकर यांनी हे मुद्दे कायदेशीर धरुन उदयनराजेंचा अंतरिम जामीन अर्ज व दहा जणांचे जामीन अर्ज नामंजुर केले. याप्रकरणी उदयनराजेंचे पी. ए. अशोक कांतीलाल सावंत, रणजित अमृत माने, राजकुमारे, कृष्णात गायकवाड, सुकुमार सावता रासकर, धनाजी नामदेव धायगुडे, ज्ञानेश्वर दिलीप कांबळे, महेश अप्पा वाघुरे, अविनाश दत्तात्रय सोनावणे, व योगेश बांदल यांना पोलीस कोठडी मिळून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी अशोक सावंत व रणजित माने हे प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात आहेत. याप्रकरणी दि. 23 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी दि. 31 मार्च, 6 एप्रिल व 10 एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणी झाली.             

उच्च न्यायालयात दाद मागणार : बनकर

उदयनराजे भोसले यांचा अंतरिम जामीन नामंजुर झाल्यामुळे उदयनराजे गटाला मोठा धक्का बसला. अटकपुर्व जामीन अर्ज असल्याने उदयनराजे न्यायालयात हजर नव्हते. अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्याने याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे साविआचे पक्षप्रतोद ऍड. दत्ता बनकर यांनी सांगितले.

 

उदयनराजेंना केव्हांही अटक होण्याची शक्यता

खा. उदयनराजे भोसले यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र मंगळवारी न्यायालयाने जामीन नामंजुर केल्याने उदयनराजे भोसले यांना केव्हाही कायदेशीर अटक होवू शकते. अशी माहिती पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.

 

जामीन नामंजुर होताच पोलिसांचा बंदोबस्त वाढला

खा. उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्यातील असून लोकप्रिय खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजुर करताच शहर पोलीस ठाण्याने बंदोबस्तात वाढ केली. एक स्ट्रायकिंग फोर्स व चौकाचौकात पोलीस उभे केले. कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्याचे सांगितले.