|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जास्तीत जास्त हसा, रागाचा मृत्यू होऊन जाईल

जास्तीत जास्त हसा, रागाचा मृत्यू होऊन जाईल 

प्रतिनिधी / बेळगाव

कपडे बदलून संत बनायला एक तास लागतो, पण स्वभाव बदलून संत बनायला 20 वर्षेही कमी पडतात. जेव्हा माणूस आपला स्वभाव शांत करतो तेव्हाच तो संत बनतो. यासाठी राग सोडण्याची गरज आहे. जास्तीत जास्त हसा म्हणजे रागाचा मृत्यू होईल, असे प्रतिपादन राष्ट्रसंत ललितप्रभ महाराज यांनी केले.

भगवान महावीर जन्म कल्याणक मध्यवर्ती उत्सव समितीच्यावतीने महावीर भवन येथे आयोजित तीन दिवशीय व्याख्यानाच्या दुसऱया सत्रात ते बोलत होते. माचीसची काडी घासली की पेटते. कारण तिला डोके असते, मात्र मेंदू नसतो. देवाने माणसाला डोके आणि मेंदू दोन्ही दिले आहेत. प्रत्येकाने मेंदूचा वापर करायला हवा. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर आकांडतांडव करणे योग्य नव्हे, असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

परिवार ते व्यापार आणि तन ते मन या गोष्टीत राग घुसला की नुकसानच होते. माणसाला दुसऱयांच्या चुकीवर जास्त राग येतो. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा स्वतःच्याच गालावर एक जोरदार थप्पड मारून घ्या. एक दिवस राग आला की दुसऱया दिवशी मीठ खायचे सोडा म्हणजे राग शांत होईल. राग आला की जीभ आणि हातावर नियंत्रण ठेवा. आईच्या पोटातून बाहेर येणारे बाळ आणि माणसाच्या तोंडातून बाहेर येणारे शब्द कधीही वापस जाऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

ताटात आवडणारी भाजी पडली की ती आम्ही खातो. तीच न आवडणारी असेल तर टाकून देतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने वाईट बोलले तर ते बोल न स्वीकारता शांत राहणे योग्य ठरते. यासाठी हास्याची सवय लावून घ्या. कॅमेऱयासमोर सारेच हसतात. मात्र अवघड परिस्थितीत जो कोणी हसतो, तोच जिंकतो. असे सांगताना कोणीही तलावाला आग लावू शकत नाही. यासाठी तुम्ही स्वतः शांततेचे तलाव बना. तुम्हाला कोणीही भडकवू शकणार नाही, असे ते म्हणाले. राजेंद्र जैन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्याख्यान ऐकण्यासाठी असंख्य नागरिक उपस्थित होते.

गुरुवार दि. 13 रोजी याच ठिकाणी सकाळी 9 वाजता घराला कसे बनवाल स्वर्ग या विषयावर व्याख्यान होणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.