|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अन् दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

अन् दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास 

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर बुधवारी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पेपर संपल्याबरोबर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शैक्षणिक वर्षातील दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच भीती देखील असते. यामुळे शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परस्परांना भेटून पेपर संपल्याचा आनंद व्यक्त केला. बुधवारी सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत समाज विज्ञान विषयाचा पेपर झाला.

दहावीच्या परीक्षेला गुरुवार दि. 30 मार्चपासून सुरुवात झाली होती. यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ज्वर दिसून येत होता. मात्र बुधवारी दहावीचा शेवटचा पेपर संपल्याबरोबर केंद्रावरच जल्लोष साजरा केला. परीक्षेचा ताण कमी झाल्याने काहींनी पालकांसोबत परीक्षा संपल्याचा आनंद लुटला. मात्र यानंतर दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात याबाबत उत्सुकता आणि चिंतादेखील असल्याचे दिसून आले.  

शेवटचा पेपर संपल्याबरोबर केंद्रावरच जल्लोष

  दररोज पेपर सुटल्यानंतर घरी जाण्याची घाई करणारे विद्यार्थी शेवटचा पेपर संपल्यानंतर निवांतपणे आनंद लुटताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. गार्डन, हॉटेल, आईस्क्रीम पार्लरमध्ये जात शेवटचा पेपर संपल्यानंतरचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. यामुळे गेल्या 15 दिवसांपासून तणावाखाली असणाऱया विद्यार्थ्यांनी धमालमस्ती केल्याचे पाहायला मिळाले.

पेपर सुटल्यानंतर परीक्षा केंद्रांबाहेर गर्दी

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 97 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यापासून परीक्षा केंद्रांवर पेपर सुरू होताना आणि पेपर सुटताना मोठय़ा प्रमाणात गर्दी होत होती. पालक परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी येत असल्याने केंद्रांबाहेर मोठय़ा प्रमाणात गर्दी होत होती. पेपर संपल्यानंतर लगेचच परीक्षा केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. परीक्षा केंद्र व्यवस्थापनाकडून पेपर सुटल्यानंतर त्या ठिकाणी थांबण्याची मुभादेखील नव्हती. मात्र बुधवारी पेपर संपल्यानंतर पुढील पेपरची चिंता नसल्याने परीक्षा केंद्रांबाहेर पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली.