|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जि.पं.स्थायी समितीची बैठक कोरमअभावी तहकूब

जि.पं.स्थायी समितीची बैठक कोरमअभावी तहकूब 

बेळगाव

जिल्हा पंचायतीच्या सामाजिक न्याय स्थायी समितीची बैठक बुधवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पण अनेक विभागांच्या अधिकारीवर्गाने बैठकीला दांडी मारल्यामुळे सदर बैठक आता पुन्हा शनिवार दि. 15 रोजी सकाळी 11 वा. बोलाविण्यात आली आहे.

बुधवारी पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकबर मारुफ, तसेच सदस्या सरस्वती पाटील, अन्नपूर्णा माळगे, जयश्री मोहिते, काद्रोळी श्याम, जितेंद्र मादार आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीसंदर्भात अधिकारीवर्गांना नोटीस देऊनदेखील ते उपस्थित न राहिल्यामुळे अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. काही अधिकाऱयांनी तर आपल्या असिस्टंटना पाठविले होते. त्यामुळे अधिकाऱयांना या बैठकीबद्दलचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

यावेळी मागासवर्ग आणि अल्पसंख्याक विभाग, भूसेना निगम, डॉ. बी. आर. आंबेडकर अभिवृद्धी निगम, बागायत खाते, जिल्हा उद्योग आदी खात्यांच्या अधिकाऱयांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शविली होती. कित्येक सदस्यही यावेळी गैरहजर होते. अधिकारीवर्ग नसल्याने बैठक घेण्यात काय अर्थ आहे, असा सवाल यावेळी उपस्थित होत होता. काही अधिकाऱयांना तर पुन्हा फोन करून बैठक असून बैठकीला या, असे सांगण्यात येत होते. तरीदेखील काहींनी फोनवरच आपण न येणाची कारणे सांगत होते.

पुढील बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून सर्व संबंधित अधिकाऱयांनी बैठकीस उपस्थित रहावे व कोणत्याही अधिकाऱयांनी आपल्या असिस्टंटना पाठवू नये, असे अध्यक्षांनी यावेळी सांगितले. बुधवारी आयोजित केलेली ही बैठक कोरमअभावी तहकूब करण्यात आली.