|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीत आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

निपाणीत आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम 

प्रतिनिधी /निपाणी :

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त शहरासह परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्याख्यान, शिबिर, मिरवणुकांसह विविध उपक्रम पार पडणार आहेत.

नगरपालिकेच्या कै. विश्वासराव शिंदे सभागृहात सकाळी 9 वाजता नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर प्रतिमा पूजन करून भीमज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता जत्राटवेस येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक नगरपालिका कार्यालयासमोर आल्यानंतर सोहळ्य़ाची सांगता होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी नगरपालिकेतर्फे 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच येथील नवनिर्माण प्रतिष्ठानतर्फे नगरपालिका सभागृहात 5 दिवस व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे.

डोळे तपासणी शिबिर

निपाणी शहर रिक्षा असोसिएशन व कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बसस्थानकानजीक मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 14 रोजी सकाळी 8.30 वाजता प्रा. अच्युत माने यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर प्रतिमेचे पूजन होणार असून त्यानंतर 9 ते 5 यावेळेत मोफत डोळे तपासणी शिबिर होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कळंत्रे यांनी केले आहे.

चिखलव्हाळ येथे विविध कार्यक्रम

चिखलव्हाळ येथील आंभिरा तरुण मंडळातर्फे डॉ. आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त 14 रोजी सकाळी 8 वाजता माणगावहून आलेल्या भीमज्योतीचे स्वागत, 8.30 वाजता डॉ. आंबेडकर प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण, सकाळी 10 वाजता मिथुन मधाळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार मांडणार आहेत. 15 रोजी रात्री 8.30 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर राजू कांबळे-नवे दानवाडे यांचा समाज प्रबोधनपर मराठी-हिंदी बुद्ध व भीम गीत गायनाचा  कार्यक्रम होणार आहे.