|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मामीच्या अनैतिक संबंधामुळेच भाच्याचा बळी

मामीच्या अनैतिक संबंधामुळेच भाच्याचा बळी 

प्रतिनिधी /संकेश्वर :

 महाविद्यालयाला जाणाऱया तरुणाला वाटेतूनच परस्पर घेऊन जाऊन त्याला जीवे मारुन पुरावा नष्ट केलेल्या आरोपीला यमकनमर्डी पोलिसांनी शिताफिने गजाआड केले. मृत तरुणाच्या मामीशी असणाऱया अनैतिक संबंधामुळेच त्याचा काटा काढला असल्याची कबुली आरोपीने दिली. यशवंत लक्ष्मण पाटील (वय 50 रा. मणगुत्ती) असे आरोपीचे नाव आहे.

 मृत भागोजी तानाजी जरळी मूळचा मणगुत्ती तर तो आईचे माहेर मोदगा येथे आजीकडे रहात होता. भागोजी याच्या मामीशी यशवंत पाटील याच्याशी गेल्या अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती भागोजीला समजलेली होती. यासंबंधाची माहिती आपल्या मामाला देईल या भीतीने यशवंतचा नेहमी डोळा भागोजीवर होता.

 आपल्या संबंधाला अडसर बनलेल्या भागोजीचा काटा काढायला हवा. या हेतूने यशवंतने त्याला जीवनातूनच संपवण्याचा कट रचला. 28 जानेवारी 2016 रोजी महागाव (ता. गडहिंग्लज) याठिकाणी महाविद्यालयाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भागोजीला यशवंतने गाठले व तेथून त्याला परस्पर घेऊन गेला. यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून संपविले.

क्रिकेट खेळणाऱया मुलामुळे घटना उघडकीस

हे प्रकरण कोणाच्याही लक्षात येऊ नये या उद्देशाने भागोजीचा मृतदेह गोणीत घालून मणगुत्तीच्या दुर्गम शेतवाडीत आणून टाकला होता. कुत्र्या-कोह्यांनी गोणी फाडून मृतदेहाचे लचके तोडले होते. यानंतर तब्बल 15 दिवसांनी म्हणजे 11 फेब्रवारी रोजी येथील शेतवाडीनजीकच्या खुल्या जागेत काही मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी खेळातील चेंडू आणण्यासाठी गेलेल्या एका मुलाला गोणीभोवती कुत्री काहीतरी खात असल्याचे आढळून आले. यावेळी चेंडू आणावयास गेलेल्या सदर मुलाने ही माहिती इतर मित्रांना दिली. यानंतर ही खुनाची घटना उघडकीस आली. या प्रकाराची माहिती यमकनमर्डी पोलिसांना देण्यात आली.