|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आमदारांनी टेंभुचे आवर्तने निश्चित करावीत

आमदारांनी टेंभुचे आवर्तने निश्चित करावीत 

प्रतिनिधी /आटपाडी :

आज आटपाडी तालुक्यातील अनेक भागात टेंभुच्या पाण्याचा लाभ लोकांना मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आमदार साहेबांनी विकासकामांचा एखादा नारळ कमी फोडला तरी चालेल. परंतू टेंभु योजनेचे पाणी नियमीत येण्यासाठी टेंभुची आवर्तने निश्चित करावीत, असे आवाहन आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी केले. तर तालुक्यातील वाईट राजकारणावर यशस्वी तणनाशक झाले असून तालुका विकासात आघाडीवर ठेवु, असा विश्वास समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी व्यक्त केला.

आटपाडी तालुक्यातील घरनिकी-बेरगळवाडी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱयांसह घरनिकीचे नवनिर्वाचित उपसरपंच विक्रम बेरगळ यांचा संयुक्त गौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, सभापती हर्षवर्धन देशमुख, जि.प.सस्दय अरूण बालटे, सौ.वंदना गायकवाड, मोहन रणदिवे, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी यमगर, रूपेश पाटील, डॉ.भुमिका बेरगळ, दादासो मरगळे, सरपंच सौ.अलका पवार, उपसरपंच विक्रम बेरगळ, दाणी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, तालुक्याच्या वाईट राजकारणावर कौठुळी पंचायत समिती गणात रूपेश पाटील यांच्या माध्यमातून यशस्वी तणनाशक मारले आहे. आता राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगिण विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आम्ही दुष्काळात जन्मलो तरी दुष्काळात मरणार नाही. तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणु. लोकांनी जागरूक रहावे आणि कामे करून घ्यावीत, असे आवाहनही सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले.

Related posts: