|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लाच स्वीकारताना तलाठय़ाला अटक

लाच स्वीकारताना तलाठय़ाला अटक 

सोलापूर / प्रतिनिधी :

भूखंड बदलून घेवून त्यावर वरिष्ठांची स्वाक्षरी करून देण्यासाठी 900 रूपयेची लाच स्वीकारताना दत्तात्रय महादेव हराळे (वय 53, पुनर्वसन कार्यालय, सोलापूर) या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. एका तलाठय़ाला रंगेहाथ पकडय़ात आल्याची ही आठवडय़ातील दुसरी घटना आहे.

यातील तक्रारदार हे पिंपळगाव (ढाळे) मध्यम प्रकल्प, ता. बार्शी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त असुन त्यांना महागाव ता. बार्शी येथे पुनर्वसनात भुखंड क्रमांक 320 हा मिळाला होता. मात्र हा भुखंड गैरसोयीचा असल्याने त्यांनी त्याच गावातील भुखंड क्रमांक 212 व 213 हा बदलून मिळावा यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

तो प्रस्ताव बदलून देण्याचे काम तलाठी दत्तात्रय हराळे यांच्याकडे प्रलंबीत होते. तक्रारदार यांना भूखंड बदलून देण्याचे आदेश तयार करून त्यावर वरीष्ठ अधिकारी यांची सही घेवून देण्यासाठी 1 हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र, यात तडजोड करून लाचेची रक्कम 900 रूपये करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार नोंदविले.

त्यावरून लाचलुचपत विभागाने तक्राराची खात्री करुन घेतली. याचा सापळा रचत गुरूवारी लाचेची रक्कम देण्यासाठी लाचलुचपत विभागाने जाण्यास सांगितले. पुनर्वसन कार्यालयात तक्रारदार सही घेण्यासाठी गेला असता त्यावेळी तलाठय़ाने 900 रूपयेची मागणी केली. ती रक्कम देत असताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेची व्हिडीओ रेकॉर्डिग करण्यात आले आहे.

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दत्तात्रय हराळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.