|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » मार्च महिन्यात निर्यातीत 27.56 टक्क्यांनी वृद्धी

मार्च महिन्यात निर्यातीत 27.56 टक्क्यांनी वृद्धी 

सोन्याची आयात वाढत 4.17 अब्ज डॉलर्सवर पोहोचली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतीय उत्पादनांच्या मागणीत वाढ झाल्याने मार्च 2017 मध्ये निर्यातीत चांगली वृद्धी झाली. मार्च महिन्यात निर्यातीत 27.59 टक्क्यांनी वाढ झाली. 2016-17 या आर्थिक वर्षात गेल्या वर्षाच्या तुलनेत 4.71 टक्क्यांनी वाढ होत निर्यात 274 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षात 262 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती.

मार्च महिन्यात देशातून 29.23 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली. पेट्रोलियम, वस्त्रोद्योग, इंजीनियरिंग आणि दागिने आणि जवाहिरांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने गेल्या महिन्यात निर्यातीत वृद्धी झाली. गेल्या महिन्यात निर्यातीबरोबरच आयातीमध्येही वाढ झाली. मार्च महिन्यात आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत 45.25 टक्यांनी वाढत 39.66 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. लग्नाचा हंगाम जवळ आल्याने सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाली. सोन्याची आयात वाढल्याने व्यापारी तूट 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात व्यापार तूट 4.4 अब्ज डॉलर्स होती. गेल्या महिन्यात सोन्याच्या आयातीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सोन्याची आयात 97.34 कोटी डॉलर्सची होती. मात्र मार्च महिन्यात ही आयात 4.17 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. सरकारकडून टीपीएस संबंधित घेण्यात आलेल्या निर्णयाचा निर्यातदारांना फायदा झाला. भविष्यात निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मदत करेल, असे निर्यातदारांची संघटना ‘फियो’ने म्हटले.

मार्चमध्ये सोने आयातीत वाढ

गेल्या मार्च महिन्याच्या तुलनेत या मार्चमध्ये सोन्याची आयात वाढत 4.17 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सोन्याच्या आयातीत वाढ झाल्याने देशाच्या चालू खाते तूटीमध्ये वाढ होण्यास मदत झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये 97.4 कोटी डॉलर्सच्या सोन्याची आयात करण्यात आली होती. फेबुवारी 2016 ते सप्टेंबर 2016 पर्यंत सोन्याच्या आयातीमध्ये सलग घसरण झाली होती. यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वाढ झाली. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आयातीचे प्रमाण कमी झाले होते.

सेवा क्षेत्राच्या निर्यातीत वाढ

फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्रातील निर्यात 5.9 टक्क्यांनी वाढत 13.06 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 12.33 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. फेब्रुवारीत सेवा क्षेत्रातील आयात 7.19 अब्ज डॉलर्सवरून वाढत 7.24 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

दर महिन्याच्या आधारे मार्च महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 247 कोटी डॉलर्सवरून वाढत 370 कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. महिन्याच्या आधारे दागिने आणि जवाहिरांची निर्यात 401 कोटी डॉलर्सवरून 411 कोटी डॉलर्सवर पोहोचली. महिन्याच्या आधारे मार्चमध्ये इंजीनियरिंग वस्तूंची निर्यात 664 कोटी डॉलर्सवरून 784 कोटी डॉलर्सवर पोहोचली.

महिन्याच्या आधारे मार्चमध्ये डाळींची आयात 42.78 कोटी डॉलर्सवरून 31.98 कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. मार्चमध्ये तांदळाची निर्यात 56.1 कोटी डॉलर्सवरून 63.7 कोटी डॉलर्सवर पोहोचली.

Related posts: