|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारकरांनो, शहापूरचे पाणी जपून वापरा

सातारकरांनो, शहापूरचे पाणी जपून वापरा 

प्रतिनिधी / सातारा

शहापूर योजनेला उरमोडी नदीतून पाटाव्दारे पाणी येते या पाटाचे तांत्रिक काम पाटबंधारे विभागाने सुरु केल्याने के.टी.वेअरमध्ये असलेल्या पाण्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. परिणामी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. हे काम चार ते सहा दिवस चालणार असल्याने शहापूरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱया नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सातारा पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.

सातारा शहरातील 50 टक्के भागाला उरमोडी धरणावर असणाऱया शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. उपळी येथे शहापूर योजनेचा के.टी. वेअर आहे. उरमोडी नदी उद्भवापासून पाटाव्दारे शहापूर योजनेच्या ठिकाणी पाणी येते आणि तिथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाटबंधारे खात्याने पाटाचे तांत्रिक काम हाती घेतले असून हे काम चार ते सहा दिवस चालणार आहे, त्यामुळे के. टी. वेअरच्या माध्यमातून अडवलेल्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

अडवलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता शहापूरचे पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी उपलब्ध असलेले पाणी नागरिकांनी काटकसरीने वापरावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे काम चार ते सहा दिवस सुरु राहण्याची शक्यता असून त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे. वाढत्या उन्हामुळे कास धरणातील पाणीपातळीही घटत असल्याने सर्वांनीच पाण्याचा वापर काटकसरीने करावा असेही आवाहनही सभापती सुहास राजेशिर्के यांनी केले आहे. सध्या पाणी जरी मुबलक असले तरी  तीव्र उन्हामुळे पाणीपातळी झपाटय़ाने खालावत आहे, त्यामुळे सातारकरांनी सहकार्य करावे.