|Thursday, December 13, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘रॉ’च्या 3 हस्तकांना अटक केल्याचा पाकचा दावा

‘रॉ’च्या 3 हस्तकांना अटक केल्याचा पाकचा दावा 

वृत्तसंस्था /  इस्लामाबाद

पाकिस्तानने 3 जणांना अटक केली असून हे तिघेही भारतीय हेरयंत्रणेचे हस्तक असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून राज्यविरोधी कारवायांमध्ये सहभागी कथित 3 रॉ हस्तकांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानच्या पोलिसांनी केला आहे.

शुक्रवारी पीओकेच्या पुंछ विभागाचे मुख्यालय रावलकोटमध्ये प्रसारमाध्यमांसमोर 3 संशयितांना चेहरा झाकलेल्या स्थितीत सादर करण्यात आले. मोहम्मद खलील, इम्तियाज आणि राशिद अशी या तिघांची नावे असून ते अब्बासपूरच्या ताराती गावाचे रहिवासी असल्याचे पाक पोलिसांकडून सांगण्यात आले.

खलील मुख्य संशयित असून नोव्हेंबर 2014 मध्ये भारतातील चेचिया गावाला त्याने भेट दिली होती. तेथेच त्याचा संपर्क रॉच्या अधिकाऱयांशी झाला, ज्यांनी त्याला आमिष दाखवून हेरगिरीसाठी तयार केल्याचे पाक पोलीस अधिकारी साजिद इम्रान यांनी म्हटले. अटक झालेल्या दोन संशयितांचे वय 30 वर्षांच्या आसपास तर तिसऱयाचे वय 20 वर्षे असल्याचे सांगण्यात आले.

पाक प्रसारमाध्यमानुसार अटक झालेल्या संशयितांनी रॉच्या निर्देशांवर दहशतवादाच्या अनेक घटनांना मूर्त रूप दिले. सप्टेंबरमध्ये अब्बासपूर पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटांमागे या तिघांचा हात असल्याचे म्हटले गेले. तिघांविरोधात आपल्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायदा तसेच स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविल्याचे पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

Related posts: