|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर

कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर 

प्रति क्विंटल 100 रुपयांची मदत मिळणार

शासन आदेश जारी

मुंबई / प्रतिनिधी

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांना प्रति क्विंटल 100 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. जुलै आणि ऑगस्ट 2016 या दोन महिन्यात बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱयांना जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत हे अनुदान मिळेल. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना 20 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.

गेल्या वर्षी कांद्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाल्याने कांद्याला दर मिळू शकला  नाही. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला होता. कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱयांवर आली होती. अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना मदत करावी यासाठी नाशिक आणि कांदा उत्पादक पट्टय़ात मोठी आंदोलने झाली होती. याशिवाय विधिमंडळातही शेतकऱयांना मदत करण्याची मागणी पुढे आली होती.

या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन आदेश शनिवारी जारी करण्यात आला. ज्या शेतकऱयांनी गेल्या वर्षी 1 जुलै ते 30 ऑगस्ट या दरम्यान बाजार समितीत कांदा विकला तेच शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱयाला जेथे कांदा विकला त्याच बाजार समितीकडे अर्ज करावा लागेल. अर्जासोबत कांदा विक्रीची पट्टी, जमिनीचा सातबारा उतारा आणि बँकेतील बचत खाते याची माहिती द्यावी लागेल.

नवी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये अनुदानाची योजना राबवली जाईल. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापाऱयांच्या कांद्याला ही योजना लागू राहणार नाही, असे पणन विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Related posts: