|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सत्ता आल्यानंतर व्यापारी आणि गेल्यानंतर शेतकरी – आमदार कडू

सत्ता आल्यानंतर व्यापारी आणि गेल्यानंतर शेतकरी – आमदार कडू 

प्रतिनिधी/ विटा

सत्ताधारी नाकर्ते आहेतच, पण विरोधक देखिल नाकर्ते आहेत. हे लोक सत्ता आली की व्यापारी आणि सत्ता गेल्यानंतर शेतकरी होतात, अशी टिका करीत शेतकरी म्हणून आम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. शेतकरी एकत्र यावा, यासाठी आसूड यात्रा काढली आहे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.

प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेची ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा शनिवारी विटय़ात आली. यावेळी वज्रधारी प्रतिष्ठानच्यावतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बैलगाडीतून आमदार कडू, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी आमदार कडू यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर शेतकरी बचत भवन येथे आमदार कडू यांनी शेतकऱयांशी संवाद साधला.

‘सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर भ्रष्टाचार थांबणार काय?’

आमदार कडू म्हणाले, जाती आणि धर्माच्या नावावर समाजात कट्टरतावाद पसरवला जातो. आम्ही शेतकऱयांचा कट्टरतावाद असावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण शेतकरी एकत्र नसल्याने त्याच्यावर अन्याय केला जातो. सत्ताधारी मंडळी शाश्वत शेतीच्या बाता मारतात, मात्र शेतकऱयांना बियाणे, खते, पाणी वेळेवर मिळते का? याचा विचार सरकारने करावा, असे सांगून कर्ज माफी झाल्यानंतर आत्महत्त्या थांबणार काय?, असे म्हणता, मग सातवा वेतन आयोग लागू केल्यावर भ्रष्टाचार थांबणार काय? असा सवाल आमदार कडू यांनी उपस्थित केला.

आम्ही शेतकरी मंडळी प्रामाणिक आहोत. दुसऱया बाजूला अप्रामाणिक लोक आहेत. मात्र सर्व नियम आमच्यासाठीच आहेत. आम्ही कसे बोलले पाहिजे? काय बोलले पाहिजे? याची चर्चा होते. आम्ही सरळ रेषेतच वागले पाहिजे, असे सांगितले जाते. मात्र शरद पवार बोलतात काय आणि करतात काय? भाजप सरकार आले तरी राममंदीर झाले काय? असे सांगून आमदार कडू यांनी सत्ताधाऱयांसह विरोधकांनाही टिकेचे लक्ष्य केले.

‘साठ वर्षे सत्तेत असणारेच संघर्ष यात्रा काढतात’

विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली, आम्ही आसूड यात्रा काढतोय. वास्तविक पाहता, सध्या विरोधात असणारेच साठ वर्षे सत्तेत होते. ज्यांनी साठ वर्षे लुटले, तेच आता संघर्ष यात्रा काढताहेत, अशी टिका आमदार कडू यांनी केली.

स्वागत रविंद्र शिंदे यांनी केले, प्रास्ताविक वज्रधारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तकुमार खंडागळे यांनी केले. शेतकरी संघटनेचे कालिदास आप्पे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ऍड. सचिन जाधव, ऍड. विजय जाधव, हणमंत पाटील, शंकर भोईटे, रणजित माने यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.