|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मिरवणुकीतील तरुणांनो शिस्त पाळा

मिरवणुकीतील तरुणांनो शिस्त पाळा 

लोकमान्यच्या शिमगोत्सवाचा आदर्श घेणे गरजेचे

बेळगाव / प्रतिनिधी

मिरवणूक म्हणजे उत्सवाचा एक भाग होय. यामुळे उत्सवात सहभागी होण्यासाठी तरुण मंडळी प्रामुख्याने अग्रक्रमावर असते. तरुणांनी मिरवणुकीत शिस्त दर्शन घडवत मिरवणुकीत सहभागी झाल्यास मिरवणूक शांततेत तसेच उत्साहात संपन्न होऊ शकते. मात्र शहरात होणाऱया विविध मिरवणुकीत तरुण मंडळी बेशिस्तपणे बेभान होऊन डॉल्बीच्या तालावर नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत असून त्यांचा मिरवणुकीतील जोश आणि उत्साह जीवावर बेतू शकतो. यामुळे मिरवणूक आणि तरुणांचा यामधील सहभाग, त्यांची वागणूक यावर विचारमंथन व्हायला हवे…

विशेषतः मिरवणूक वेळेत व शिस्तीत होण्यासाठी तरुण, युवक मंडळे तसेच विविध संस्थांनी मिरवणुकीत सहभागी होताना स्वतःला काही नियम घालून घेत प्रशासनातर्फे सांगण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मिरवणुकीत होणारा शिस्तीचा भंग आणि वेळ यावर मर्यादा घालून मिरवणुकीला शिस्त लावावी. यावेळी खऱया अर्थाने विविध समाजबांधवांतर्फे काढण्यात येणाऱया मिरवणुकीला उत्सवाचे स्वरुप प्राप्त होईल. उत्सव साजरा करताना मिरवणूक एक माध्यम असून यामुळे इतर समाजबांधव तसेच वाहतुकीची शिस्त, प्रशासनाचे नियम यांना वेठीस धरले जाणार नाही याचे भान ठेवणे गरजेचे आहे. डॉल्बीच्या तालावर बेभान होऊन डोलणाऱया तरुण मुलांना कोणत्याही गोष्टीचे भान नसते. ना जीवाची पर्वा ना नियमांची चिंता अशा आविर्भावात ते मिरवणुकीत भाग घेतात. डॉल्बीवर चढणे, डॉल्बीवर उभारून नृत्य करणे, मिरवणुकीतील वाहनांसमोरून न हलता त्याच ठिकाणी नृत्य करणे, एकमेकांना धक्का देणे असे कृत्य केले जाते. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून तरुणांनी सजग व्हायला हवे.

मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा

बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीची शतकोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे शिवजयंती मिरवणूक भव्य स्वरुपात पार पडते. सदर मिरवणूकदेखील शांततेत तसेच वेळेत पार पाडण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कार्यरत राहायला हवे. ठरवून दिलेल्या वेळेत मिरवणुकीस प्रारंभ झाला तर रात्री वेळेत पार पडते. शहरातील विविध मंडळांचे चित्ररथ नेमून दिलेल्या वेळेत त्या-त्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने मिरवणूक लांबत जाते. यामुळे प्रेक्षकांनादेखील बराच वेळ ताटकळत थांबावे लागते. युवकांनी याचा विचार करत मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा.

मिरवणुकीत अशा प्रकारची दु:खद घटना घडल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.  मात्र, काही काळानंतर या गोष्टीचा विसर पडतो. मिरवणुकीत पुन्हा बेशिस्तपणा  पाहायला मिळतो. एखादी घटना घडल्यानंतर त्याचा केवळ विचार करून परिस्थिती बदलत नाही. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यामधून धडा घ्यावा आणि पुढील होणाऱया मिरवणुकीत शिस्तीने सहभागी होऊन मिरवणूक शांततेत पार पाडावी, त्याचवेळी खऱया अर्थाने समाजाने या घटनेतून धडा घेतल्याची जाणीव होईल.

मिरवणुकीत सहभागी होताना…

मिरवणुकीत सहभागी होताना वेळेचे भान बाळगावे

आपले आरोग्य विचारात घेऊन मिरवणुकीत सहभाग घ्यावा

डॉल्बीच्या अधिक आवाजाचा त्रास होत असल्यास मिरवणुकीत भाग घेणे टाळावे

मद्य सेवन करून बेधुंद अवस्थेत मिरवणुकीत भाग घेऊ नये

न खाता-पिता उपाशी पोटी तासन्तास डॉल्बीच्या तालावर नाचणे टाळावे

लहान मुलांनी मिरवणुकीत सहभाग घेताना, आपल्या पालकांसमवेत राहावे

 तरुणांनी डॉल्बीवर चढून नृत्य करणे टाळावे

लोकमान्यतर्फे आयोजित शिमगोत्सवाच्या मिरवणुकीत घडले शिस्तीचे दर्शन…

लोकमान्य सोसायटीतर्फे रविवारी गोव्यातील शिमगोत्सवाच्या पारंपरिक संस्कृतीचे   दर्शन शहरात झालेल्या चित्ररथ मिरवणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ओस्सय.. ओस्सय म्हणत गोव्याचे पारंपरिक शिमगोत्सवाचे चित्र मिरवणुकीच्या माध्यमातून सादर करण्यात आले. सदर मिरवणूक वेळेत आणि शिस्तीत पार पडली. अचूक ठरवून दिलेल्या मार्गाने शिस्तीत मिरवणूक सायंकाळी 6 पासून प्रारंभ झाली. मिरवणूक रात्री 11 पर्यंत ठरलेल्या वेळेत पार पडली. या मिरवणुकीत शिस्तीचे दर्शन घडले. शिमगोत्सवात सहभागी झालेले कलाकार आपली कला दर्शवत असताना मिरवणूक पाहायला आलेल्या रसिकांचा अडथळा होऊ नये म्हणून चित्ररथाच्या बाजूने साखळी धरून दोन्ही बाजूने प्रेक्षकांसाठी जागा मोकळी ठेवण्यात आली होती. यामुळे शिस्तबद्धतेचे दर्शन झाले. गोव्याच्या कलाकारांनीदेखील आपली पारंपरिक कला सादर करताना इतरांना त्रास होणार नाही याचे भान ठेवत मिरवणूक पार पाडली.

Related posts: