|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दुर्दैवी व दु:खद

दुर्दैवी व दु:खद 

बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका प्राध्यापकासह सात विद्यार्थ्यांचा शनिवारी मालवणजवळ समुद्रात बुडून झालेला अंत सर्वस्वी दुर्दैवी आणि दु:खद म्हणावा लागेल. मोठी स्वप्ने पाहत बागडणारी ही फुलपाखरे एका भव्य लाटेत संपून गेली. त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला व कुटुंबीयांवर दु:खाचे आभाळ कोसळले. त्यांच्या पालकांना, नातेवाईकांना, गुरुजनांना हा धक्का सहन होणारा नाही. काळाचा फटका किती क्रूर व कठोर असतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. हा व असा दुर्दैवी प्रसंग प्रथमच घडला असे नाही. या समुदकिनारी आणि अन्यत्र असे फटके वारंवार बसतात. पण यातून जे शहाणपण घ्यायचे आणि ज्या सुधारणा करायच्या त्या होत नाहीत. ज्यांच्या वाटय़ाला हे दु:ख आले त्यांच्या दु:खाची कल्पनाही करवत नाही. आपली तरुण मुलगी-मुलगा अभियांत्रिकेचे शिक्षण घेतोय. शिक्षणात, मित्र-मैत्रिणीत रमतोय आणि उद्या तो यशस्वी होऊन जीवनात नवे-चांगले करून दाखवणार अशी अपेक्षा बाळगून जे पालक वावरत होते, सुख स्वप्ने पाहत होते त्यांना काळाने दिलेला हा फटका सहन होणारा नाही. ‘क्षणात होत्याचे नव्हते होणे’ म्हणजे काय याची दुर्दैवी प्रचिती त्यांच्या वाटय़ाला आली आहे. अभियांत्रिकीची पदवी आणि मोठय़ा संधी व चांगले ज्ञान घेऊन जी मुले-मुली घरी येणार असे चित्र डोळय़ासमोर होते,  तेथे त्या मुलांचे कलेवर दारात यावे या सारखा कठोर, दुर्दैवी आणि दु:खद प्रसंग नाही. पण, तो आला आहे व त्यातून सावरणे, सावध होणे आणि जीवनाला सामोरे जाणे याशिवाय पर्याय नाही. महाविद्यालयीन जीवन हे खऱया अर्थाने फुलपाखरासारखे असते. जीवन घडवण्याचा तो महत्त्वाचा कालखंड असतो. तुफानावर स्वार होण्याचे आणि अशक्य ते शक्य करण्याचे ते वय असते. पण, या वयात संयम, सावधानता आणि जबाबदारीचे भानही गरजेचे असते. मालवणचा जलदुर्ग बघून ही मंडळी स्नानासाठी समुद्रात उतरली मौजमजा करताना आणि समुद्राच्या पाण्यात खेळताना आपण आतवर ओढले गेलो आहोत आणि आपल्या पायाखालची वाळू सरकली आहे हे समजायच्या आतच ही मुले समुद्रात ओढली गेली आणि मग हा दुर्दैवी प्रसंग घडला. जिथे ही घटना घडली तो किनारा धोकादायक आहे यांची सर्वांना कल्पना दिली गेली होती. पण, असे प्रसंग कोकणातील मालवणात आणि गणपती पुळे वगैरे ठिकाणी सातत्याने घडत असतात. याच ठिकाणी पाठोपाठ घडलेली ही तिसरी दुर्घटना आहे. एका दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेला आहे. शासन व पर्यटन कंपन्या पर्यटनासाठी आणि व्यवसायासाठी कोकण किनारपट्टीला महत्त्व देत आहेत आणि दिलेही पाहिजे. जगभर पर्यटनाला महत्त्व आहे. कोकणात, मालवण गोवा-परिसरात पर्यटनाला प्रचंड वाव आहे. पण, पर्यटन व्यवसाय वृद्धी करताना पर्यटकांना सुविधा व सुरक्षा हवी याचेही भान ठेवले पाहिजे. युवकांच्यात साहसी पर्यटनाचाही कल वाढतो आहे. तसे नव-नवे खेळ पर्यटनात समाविष्ट होत आहेत. ते असायलाही हरकत नाही. पण, त्याची सुरक्षितता तपासायला हवी. त्याचे परवाने देताना शासनाने योग्य ते सुरक्षा मापदंड आहेत ना याची खातरजमा करायला हवी. धोकादायक किनारे व स्थळे जिथे आहेत तिथे जीवनरक्षक साधने व सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि हवा, पाणी, अग्नी आदी पंचमहाभूतांची प्रचंड शक्ती दुर्लक्षून पर्यटकांनी दु:साहसही करता कामा नये. शहरी वातावरणात वाढलेल्या आणि गंभीर नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासात, पर्यटनात असलेले धोके व त्यावर मात करण्याची कला शिकवली पाहिजे. असे दु:साहस न करता पर्यटनाचा आनंद कसा घ्यावा याचे मार्गदर्शनही केले पाहिजे. दक्षिणेत पर्यटनाला आलेल्या काहींना वाटेत धाब्यावर किंवा हॉटेलमध्ये सहज म्हणून गर्दच्या सिगार देण्याच्या घटना अलीकडेच पुढे आल्या आहेत. या सिगार गर्द व अमली  टोळय़ाकडून दिल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे व बस प्रवासात सहप्रवासी असल्याचे भासवून काही खायला देऊन बेशुद्ध करून दागिने लुटणे वगैरे गुन्हे नित्याचेच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सावधपणा आणि संयमीपणा महत्त्वाचा आहे. पर्यटकांनी काही ठिकाणचे पावित्र्य आणि निसर्ग शक्तीचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मालवणमधील या दुर्दैवी घटनेनंतर तेथील आमदारांनी व स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे जे दर्शन घडवले, सरकारी यंत्रणेने जी तत्परता व संवेदना दाखवली त्याला तोड नाही. खरे तर ते कर्तव्यच असते आणि असे कर्तव्य जागोजागी जागते असले पाहिजे. शालेय जीवनात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सहल हा आवश्यक व गरजेचा भाग असतो. अलीकडे चंगळवाद बोकाळल्याने शालेय सहलीबरोबरच खासगी व कौटुंबिक सहलींना ऊत आला आहे. जोडून सुट्टय़ा आल्या की पर्यटन केंद्राच्या गावी पाय ठेवायला जागा नसते. सर्व व्यवस्था कोलमडतात. चक्काजाम होतो  या संदर्भाने नियोजन तर व्हायलाच हवे. पण, वाहतुकीपासून निवासापर्यंत आणि नियोजनापासून आचारसंहितेपर्यंत सर्वच गोष्टीचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. जोडून आलेल्या सुट्टय़ा म्हणजे बेभान होऊन चैन ही कल्पनाही मागे टाकली पाहिजे आणि संयम, शिस्त यातूनही आनंद मिळतो, मिळवता येतो हे शिकले-शिकवले पाहिजे. बेळगाव परिसरातील ही उमलती मुले काळाच्या आकस्मिक तडाख्याने संपली. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी शब्द नाहीत. या महाविद्यालयावर आलेले दु:खाचे सावट दूर व्हायलाही बराच काळ जाईल. पण, यातून सावरावे लागेल आणि अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये, असे दुर्दैव पुन्हा कुणावर ओढवू नये म्हणून सर्वांना सावधही करावे लागेल. जीवन चांगले आहे. पण, त्यात धोकेही आहेत. संयमाने आणि सावधानतेने त्याचा आनंद घेतला पाहिजे, घेऊ दिला पाहिजे या दुर्घटनेचा तोच धडा आहे. शासनानेही अशा धोकादायक ठिकाणी आवश्यक साधन-सुविधा व सूचना देणारी यंत्रणा उभारली पाहिजे. संबंधितांना दुर्दैवी दु:खद प्रसंगातून सावरण्याची शक्ती लाभो हीच प्रार्थना !