|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » यजमान मुंबई इंडियन्सचा विजयाचा ‘चौकार’

यजमान मुंबई इंडियन्सचा विजयाचा ‘चौकार’ 

गुजरात लायन्सवर 6 गडी राखून एकतर्फी मात,

वृत्तसंस्था / मुंबई

सामनावीर नितीश राणा (36 चेंडूत 53), कर्णधार रोहित शर्मा (29 चेंडूत नाबाद 40) व केरॉन पोलार्ड (23 चेंडूत 39) यांच्या फटकेबाजीच्या बळावर यजमान मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या साखळी सामन्यात रविवारी गुजरात लायन्सचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. मुंबईसाठी या हंगामात 5 लढतीत हा चौथा विजय ठरला. वानखेडेवर गुजरातने 20 षटकात 4 बाद 176 धावा जमवल्या तर मुंबईने 19.3 षटकात 4 बाद 177 धावांसह विजय संपादन केला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले.

विजयासाठी 177 धावांचे कठीण आव्हान असताना नितीश राणाने आपल्या प्रगल्भ फलंदाजीचा दाखला देत 36 चेंडूतच 53 धावांची आतषबाजी केली व विजयासाठी भक्कम पायाभरणी केली. प्रारंभी, सलामीवीर पार्थिव पटेल भोपळा फोडण्याआधीच बाद झाला, त्यावेळी मुंबईला धक्का बसला. पण, 24 चेंडूत 26 धावा जमवणाऱया जोस बटलरसह नितीश राणाने 9 षटकात 85 धावांची दणकेबाज भागीदारी साकारत मुंबईच्या आव्हानात जान भरली.

नितीश राणाच्या 36 चेंडूतील खेळीत 4 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. कर्णधार रोहित शर्माला सापडलेला सूर देखील मुंबई इंडियन्ससाठी सुखावणारा ठरला. रोहितला एकदा नॉन स्ट्रायकर एण्डकडे असताना पोलार्डच्या जोरदार फटक्यावर इजा झाली. पण, तरीही यातूनही मार्ग काढत त्याने संघाला विजय मिळवून देईतोवर मैदानावर ठाण मांडले.

अनुभवी प्रवीणकुमारच्या शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज असताना रोहितने प्रवीणकुमारचा यॉर्कर चौकारासाठी पिटाळला व पुढे सलग दोन चेंडूंवर दुहेरी धावा घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीतील 14 वे षटक मुंबईसाठी तारणहार ठरले. रोहितने त्यावेळी मुनाफच्या षटकात चौकार लगावला तर पोलार्डने देखील उत्तुंग षटकार खेचला. पुढे, रोहितने जडेजाला एक्स्ट्रा कव्हरकडे षटकारासाठी पिटाळत आक्रमक खेळाचे इरादे स्पष्ट केले.

पोलार्ड या हंगामात विशेष बहरात असून पहिल्या चेंडूपासूनच त्याने गुजरातच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत त्याने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणले. गुजरातर्फे अँड्रय़ू टायने 34 धावांत 2 तर मुनाफ पटेल व प्रवीणकुमारने एकेक गडी बाद केला.

गुजरातच्या डावात मेकॉलमची फटकेबाजी

तत्पूर्वी, गुजरातने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर निर्धारित 20 षटकात 4 बाद 176 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर डेव्हॉन स्मिथ दुसऱयाच चेंडूवर बाद झाल्यानंतर किवीज फलंदाज ब्रेन्डॉन मेकॉलमने फटकेबाजी सुरु केली व 44 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांसह सर्वाधिक 64 धावांची बरसात नोंदवली. कर्णधार रैनाने 29 चेंडूत 28 धावा केल्या तर इशान किशनला 11 धावांवर समाधान मानावे लागले.

तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने मात्र तडफदार फलंदाजी साकारत अवघ्या 26 चेंडूत जलद, नाबाद 48 धावा उभारल्या. त्याच्या खेळीत 2 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. रैना व मेकॉलम यांची 60 चेंडूतील 80 धावांची भागीदारी विशेष लक्षवेधी ठरली. या उभयतात मेकॉलम अधिक आक्रमक राहिला. मुंबईतर्फे मॅकक्लॅघनने 24 धावात 2 तर मलिंगा व हरभजन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. मलिंगा येथे बराच महागडा ठरला. त्याला 4 षटकात 51 धावा मोजाव्या लागल्या.

किट वेळेत न पोचल्याने ऍरॉन फिंच सामन्यातून बाहेर!

एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे, प्रकृती अस्वास्थामुळे किंवा फॉर्म नसल्याने एखाद्या सामन्यात सहभागी होता आले नाही तर समजून घेता येईल. पण, गुजरात लायन्सचा फलंदाज ऍरॉन फिंच शनिवारी चक्क आपली क्रिकेट किटची बॅग न आल्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू शकला नाही आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. फिंचचे क्रिकेट किट राजकोटमधून मुंबईत वेळेत पोहोचू शकले नाही. यामुळे, तो खेळू शकणार नसल्याचे गुजरात लायन्स व्यवस्थापनाने स्पष्ट केले. फिंच सहकारी खेळाडूकडून किट घेऊन खेळू शकत होता. पण, जाहिरातीच्या करारानुसार, बॅटवरील लोगो बदलून चालणार नव्हते. त्यामुळे, सामन्यातून बाहेर बसणेच त्याने अधिक पसंत केले.

धावफलक

गुजरात लायन्स : डेव्हॉन स्मिथ झे. राणा, गो. मॅकक्लॅघन 0 (2 चेंडू), ब्रेन्डॉन मेकॉलम त्रि. गो. मलिंगा 64 (44 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), सुरेश रैना झे. शर्मा, गो. हरभजन सिंग 28 (29 चेंडूत 2 चौकार), इशान किशन झे. कृणाल पंडय़ा, गो. मॅकक्लॅघन 11 (14 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक नाबाद 48 (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), जेसॉन रॉय नाबाद 14. (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 11. एकूण 20 षटकात 4/176.

गडी बाद होण्याचा क्रम-1-1 (डेव्हॉन स्मिथ), 2-81 (रैना), 3-99 (मेकॉलम), 4-153 (इशान किशन).

गोलंदाजी : मॅकक्लॅघन 4-0-24-2, लसिथ मलिंगा 4-0-51-1, हरभजन 4-0-22-1, जसप्रीत बुमराह 4-0-45-0, कृणाल पांडय़ा 3-0-18-0, हार्दिक पांडय़ा 1-0-15-0.

मुंबई इंडियन्स : पार्थिव पटेल झे. रॉय, गो. प्रवीणकुमार 0 (2 चेंडू), जोस बटलर झे. मेकॉलम, गो. पटेल 26 (24 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), नितीश राणा झे. कार्तिक, गो. टाय 53 (36 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा नाबाद 40 (29 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), केरॉन पोलार्ड झे. जडेजा, गो. टाय 39 (23 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 6 (3 चेंडूत 1 चौकार). अवांतर 13. एकूण 19.3 षटकात 4/177.

गडी बाद होण्याचा क्रम -1-0 (पार्थिव), 2-85 (राणा), 3-92 (बटलर), 4-160 (पोलार्ड).

गोलंदाजी : प्रवीणकुमार 2.3-0-25-1, बसिल थाम्पी 4-0-34-0, मुनाफ पटेल 4-0-35-1, ऍन्ड्रय़ू टाय 4-0-34-2, रवींद्र जडेजा 4-0-34-0, डेव्हॉन स्मिथ 1-0-12-0.