|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जाती-धर्मापेक्षा शेती प्रश्नासाठी ‘दंगल’ आवश्यक

जाती-धर्मापेक्षा शेती प्रश्नासाठी ‘दंगल’ आवश्यक 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

 ‘सरकार पत्थर चलाते है, तो हमे उनपे बॉम्ब चलाना पडेगा’, अशी टिका करतानाच सभागृहात 85 टक्के आमदार ही शेतकऱयाची पोरं असून देखील कर्जमाफीचे विधेयक येत नाही, आणि आलेच तर ते मांडले जात नाही. यामुळे शेतकऱयांचे प्रश्न सुटलेले नाहीत. जाती-धर्माच्या दंगली करत आम्ही समाजात विषमता निर्माण करतो, मात्र आता विविध प्रश्नांसाठी शासन व शेतकऱयांच्यात दंगल होणे गरजेचे आहे. आम्ही शेतकरी म्हणून जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन आ.बच्चू कडू यांनी केले.

प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेची ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा रविवारी इस्लामपुरात दाखल झाली. दरम्यान वाळवा पंचायत समिती येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास आ.बच्चू कडृ, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर आ.कडू यांनी शेतकऱयांशी संवाद साधला.

आमदार कडू पुढे म्हणाले, शेतकऱयाच्या खिशावर दरोडा पडत असताना आम्ही गप्प का बसलोय. शेतकरी एकत्र यावा म्हणून ही आसूड यात्रा काढली आहे.  16 लाख कर्मचाऱयांच्यात एकी असल्याने सरकारचे त्यांना झूकते माप आहे. पण 8 कोटी शेतकऱयांच्या बाजूने सरकार झुकताना दिसत नाही. शेतीमालाला भाव नसल्याने शिक्षण व अरोग्य शेतकऱयापासून दूर चालले आहे. अशा चक्रव्युव्हात शेतकरी अडकला आहे. या आंदोलना दरम्यान जर गोळी चालली, तर ती पहिली आमच्यावर चालेल अन् मग शेतकऱयावर चालेल. मरता येत नाही म्हणून जगावे लागते, अशी अवस्था सध्या शेतकऱयाची झाली आहे. आजची ही वेळ शेतकरी शेतकऱयाला विसरल्यामुळे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावी एक हजार शेतकरी रक्तदान करुन आता तरी शोषन थांबवा, अशी विनंती करणार आहेत.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकऱयाची कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून पिकाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. या आसूड यात्रेद्वारे शेतकऱयांचा सातबारा कोरा झाला पाहिजे व माक्रोफायनान्सच्या विळख्यात अडकलेल्या महिला कर्जमुक्त झाल्या पाहिजेत, अशा मागण्या आहेत. शेतकरी व विद्यार्थ्यांना दिलेली कर्जे वसुल करताना शासनाने घालून दिलेले नियम बँका धाब्यावर बसवून वसुली करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारला उद्योगपतींनी बुडवले आहे. शेतकऱयांना कर्जमाफी मागताना सरकारी अधिकारी विरोध करीत आहेत. या अधिकाऱयांचा बोलवता धनी दुसरा तिसरा कोणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत सत्तेवर अलेल्या पंतप्रधानांना सर्व जनतेने साथ दिली, पण त्यांचा स्वतःचा विकास होत चालला असल्याची टिका रघुनाथदादा पाटील यांनी केली.

स्वागत शंकर मोहिते यांनी केले. तर सत्यजित देशमुख, अतुल खुपसे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शंकर गायकवाड, सुनिल पाटील, हणमंत पाटील, माणिक पाटील, ऍड.अविनाश पाटील, धनपाल माळी, रमेश पाटील, रविंद्र पिसाळ, यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Related posts: