|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिक्षक-पोलीस बाचाबाचीने दापोलीत वातावरण तापले

शिक्षक-पोलीस बाचाबाचीने दापोलीत वातावरण तापले 

शहर वार्ताहर/ दापोली

जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत रविवारी मतदानाच्या वेळी शिक्षक आणि साध्या वेषातील एका पोलिसादरम्यान झालेल्या बाचाबाचीने दापोलीतील वातावरण सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास चांगलेच तापले. पण वरीष्ठ अधिकाऱयांच्या मध्यस्थीनंतर यावर समझोता करण्यात आला. दरम्यान दापोलीतील मतदान केंद्रात 617 पैकी 603 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला.

शहरातील गाडीतळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत या निवडणुकीचे मतदान केंद्र होते. या निवडणुकीसाठी शिक्षकांच्या सात संघटनांची महायुती आणि उर्वरित सत्तारूढ दोन संघटनांचे एकता पॅनेल आमने-सामने आहे. दापोली तालुका उमेदवार म्हणून एकता पॅनेलचे अविनाश मोरे आणि महायुतीचे रमाकांत शिगवण आमने-सामने होते. जिल्हा उमेदवार पदासाठी विनायक वाळंज हे एकमेव रिंगणात आहेत. या उमेदवारांनी दापोली तालुक्यात जोरदार प्रचार केल्याने सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी झाली होती.

यावेळी शाळेच्या आवारात जमलेल्या शिक्षकांना एका साध्या वेषातील पोलिसाने रांगेत उभे राहण्याची सूचना केली. नेहमी मुलांना रांगेत उभे रहा, असे फर्मावणाऱया गुरूजींना रांगेत उभे राहण्याविषयी कोणी सांगतो म्हणजे काय? असा प्रश्न उभा राहिल़ा साध्या वेषातील पोलीस असल्याचे लक्षात न आल्याने मतदार शिक्षकाने त्याच्याशी जोरदार बाचाबाची केली. विरोधी पक्षातील कार्यकर्ताच आपल्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे समजून या शिक्षकानेही त्या पोलिसाची गचांडी धरली. एवढेच नव्हे तर आजूबाजूचे सर्व शिक्षकही त्याच्यावर आगपाखड करू लागले.

शेवटी साध्या वेषातील व्यक्ती खराखुरा पोलीस असल्याचे समजल्यानंतर सारवासारवीची भाषा होऊ लागली. आधी बाचाबाची करताना वाघाचे बळ आलेले गुरूजी नंतर अगदी आज्ञाधारक झालेले संबंधित शिक्षकांना पोलीस ठाण्यात नेण्यात आल़े गुरूजींना पोलीस स्थानकात नेऊन बसवण्यात आल्याने त्यांची अवस्था बिचारा अशी झाल़ी दिवसभर मतदान केंद्राबाहेर या प्रकरणाची रंगतदार चर्चा सुरू होती. रविवारी दापोली तालुक्यातील 617 पैकी 603 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावत विक्रमी मतदानाची नोंद केली. भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर दोन्ही गटांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.